माझे वडील हयात नसताना शरद पवारांची टिप्पणी चुकीची – राधाकृष्ण विखे-पाटील  

0
750

मुंबई, दि. १४ (पीसीबी) –  माझे वडील हयात नसताना त्यांच्याबदल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेली  टिप्पणी  योग्य नाही. डॉ. सुजयने घेतलेला निर्णय त्याच्यासाठी योग्य असेल. मात्र, आघाडीला कोणतेही गालबोट लागले, असे विधान मी केलेले नाही. परंतू, शरद पवार यांच्याकडून केली जाणारी विधाने चुकीची आहेत, असे काँग्रेस नेते व विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

डॉ सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर  राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण अद्याप राजीनामा दिलेला नाही,  असे सांगितले होते.  यावर काँग्रेस नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांनी काँग्रेसच्या निष्ठेबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे म्हटले होते. तर आज (गुरूवारी)  राधाकृष्ण विखे यांनी पक्ष श्रेष्ठींना भेटून निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे.

नगर लोकसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला होता. तसेच येथे काँग्रेसला विजयी होण्याची शक्यता  होती, त्यामुळेच नगरची मागणी आम्ही करत होतो. याबाबत योग्य समन्वय साधण्याचा आमचा प्रयत्न होता,  असे विखे पाटील यांनी सांगितले.