Pimpri

“माझे नगरसेवकपद रद्द करण्याची धमक कोणामध्ये नाही”

By PCB Author

November 26, 2021

– राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांचा पत्रकार परिषदेत दावा

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचे पद रद्द करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले, या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचा दावा नगरसेविका सुलक्षणा धर- शिलवंत यांनी केला आहे. विभागीय आयुक्तांनी माझे नगरसेवक पद रद्द केले नाही, त्यांना तो अधिकार नाही. मला जो आदेश समाजमाध्यमावर मिळाला व ज्यावरून बातम्या केल्या गेल्या. त्यामध्ये कुठेही माझे रद्द करतोय असे त्यांनी म्हटलेले नाही. त्यांनी फक्त निष्कर्ष काढलेले आहेत. त्यामुळे माझे नगरसेवक पद रद्द करण्याचा दम व धमक कोणामध्येच नाही, अशी दर्पोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेला थेट पद्धतीने मास्कचा पुरवठा करणाऱ्या मे.एडिसन लाईफ सायन्स प्रा.लि.या कंपनीशी संबंध सिद्ध झाल्यामुळे शिलवंत यांचे पद रद्द करण्यासाठी माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी केलेला अर्ज मान्य करण्यात आला आहे. त्यावर विभागीय आयुक्त यांनी पद रद्द करण्याबाबतचे निष्कर्ष जारी केले आहेत. याबाबत सुलक्षणा शिलवंत यांनी आपली सविस्तर बाजू पत्रकार परिषदेत मांडली.

शिलवंत म्हणाल्या, मला समाजाने निवडून दिले आहे. समाजाचा माझ्यावर विश्वास आहे. समाजकार्य आमच्या अंगवळणी आहे, तो वारसा माझे दिवंगत वडील अशोक शिलवंत यांच्याकडून मिळाला, समाजकार्य करीत असताना त्याच्याकडे मी राजकारण म्हणून बघत नाही. राजकारण हा माझा व्यवसाय नाही. मास्कच्या कंत्राटामध्ये १० रुपयांना मास्क दिले आहे. लॉकडाऊनच्या काळात तोच मास्क २० ते २५ रुपयांना मिळत होता. महापौरांनी त्यावेळी आम्हाला गरीब नागरिकांना मास्क वाटायचे असल्याचे सांगितले होते. त्यांना १५ लाख मास्क वाटायचे होते. त्यासाठी महिला बचतगटांना ते काम देण्याचा प्रयत्न झाला. मात्र तेवढे मास्क मिळाले नाही. माझ्या संस्थेकडे मास्क उपलब्ध होते. आयुक्तांना मास्क मिळत नसल्याने त्यांनी आमच्या संस्थेकडे विचारणा केली. महापालिकेच्या मागणीवरून पुरवठा केला असल्याचे साधे चित्र आहे, असे शिलवंत म्हणाल्या.

जितेंद्र ननावरे यांनी खोडासाळपणा करत हे केले. त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली, त्यामध्ये त्यांनी मी आयुक्त, विभागीय आयुक्तांकडे न्याय मागतोय मात्र मला कोणी न्याय देत नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांना आदेश दिले त्यामध्ये त्यांनी दोघांचे म्हणणे ऐकून ते निकाली काढा असे सांगितले. त्यावर सुनावणी देखील झाली. मात्र, “विभागीय आयुक्तांच्या पत्रामध्ये या कारणावरून मला असे वाटत आहे” असे लिहण्यात आले आहे. त्यामध्ये कुठेही पद्द रद्द करावा असा उल्लेख नाही. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या पत्रावरून मी पुढे काय करणार असे अनेक जण विचारत असल्याचे शिलवंत यांनी सांगितले. याबाबत त्या म्हणाल्या, विभागीय आयुक्तांनी निष्कर्ष काढला आहे. त्यांनी आदेश दिले नाहीत.

त्यामुळे माझे पद्द रद्द होण्याचा विषय नाही जर पद रद्द करण्याबाबत आदेश असता तर मी आव्हान दिले असते. मात्र या निष्कर्षासाठी मी काय करणार,ठोस निर्णय दिलेला नाही. विभागीय आयुक्तांना माझे पद्द रद्द करण्याचा अधिकार नसल्याचे शिलवंत यांनी सांगितले. यामुळे माझे नगरसेवक पद रद्द होणार यामध्ये काहीही तथ्य नाही, मी मागास्वर्गीय समाजाचे नेतृत्व करत आहे, मला वारंवार येनकेन प्रकारे त्रास देऊन माझ मानसिक खाच्चिकरण व सामाजिक प्रतिष्ठा सातत्याने कमी करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून टार्गेट करुन केला जातोय, मी यामुळे खचून न जाता अधिक जोमाने सामाजिक काम करेन, असे शिलवंत या पत्रकारांरशी संवाद साधताना म्हणाल्या.