Maharashtra

“माझी सर्वांना हात जोडून लॉकडाउन गांभीर्याने घ्या – अध्यक्ष राज ठाकरे

By PCB Author

April 04, 2020

 

मुंबई, दि.४ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, “माझी सर्वांना हात जोडून लॉकडाउन गांभीर्याने घ्या अन्यथा मोठे अर्थसंकट निर्माण होईल अशी विनंती आहे.

हा लॉकडाउन पाळला नाही आणि प्रकरण वाढत गेलं तर दिवस वाढतील. दिवस वाढले तर यंत्रणेवर ताण येईल. यंत्रणेवर ताण आला तर सरकारवर येईल. कर मिळणार नाही. याचा परिणाम उद्योगधंद्यांवर होणार, नोकऱ्या जाणार. काय करायचं हे लोकांना कळणार नाही. हे सगळं आपल्या एका चुकीमुळे होणार आहे”.

“अनेकांना वाटते काय फरक पडणार आहे. या देशात अनेक माणसे आजपर्यंत मरतच आहेत. टीबीने वैगेरे लोक मरतात अशी उदाहरणे देतात. पण त्या बाकीच्या रोगांवर औषधे तरी आली. यावर अद्याप आलेले नाही. आपल्याकडे व्हेटिलेटर्स नाहीत तेवढे,” असे राज ठाकरेंनी यावेळी सांगितले

“हा जो लॉकडाउन आहे गांभीर्याने घ्यावा. लोकांना रेशन, भाजीचे असे अनेक प्रश्न पडले आहेत. अनेक ठिकाणी सरकार उपलब्ध करुन देत आहे. पण मला भीती एका गोष्टीची आहे ती म्हणजे जर लॉक़डाउन वाढवला तर त्याचे गंभीर परिणाम होतील. सरकारकडे कोणताही कर येणार नाही. उद्योगधंद्यावर परिणाम होतील. आधीच ५० टक्क्यांवर पगार आणले आहेत. जितके दिवस वाढवू तसा परिणाम होत जाणार. शिस्त पाळली जाणार नाही तर अर्थसंकट निर्माण होईल. मोदी यावर काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती,” असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “जे लॉकडाउन पाळत आहेत त्यांच्या मनात भीती आहे. नोकरी राहणार का ? उद्या भाजीपाला मिळणार का ? असे प्रश्न त्यांना सतावत आहेत. जे शिस्त पाळत नाही आहेत त्यांच्यामुळे हे घडत आहे. व्हॉट्सअप, चॅनेलवर ज्या बातम्या येत आहेत ते पाहूनच धक्का बसतो. आजकाल प्रत्येक घरी एक डॉक्टर झाला आहे. कोणी म्हणतं गोमूत्र प्या, लसूण खा, कांदा खा….डॉक्टर काय उगाच मेहनत करत नाही आहेत. जीव धोक्यात घालून ते काम करत आहेत”.