‘माझी जानशी लहानपणापासून ओळख; परवाच एकत्र चहा प्यायलो’; ‘त्या’ संशयित दहशतवाद्यांच्या अटकेनंतर मित्रांना धक्का

0
661

– सहा संशयितांना पाकिस्तानातून प्रशिक्षण मिळत असल्याची माहिती ; सहा संशय़ित अटक

मुंबई, दि.१५ (पीसीबी) : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने देशात बॉम्बस्फोट घडवण्याच्या मोठा कट उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची त्यांची योजना असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली असून त्यापैकी एक मुंबईच्या धारावी परिसरातील रहिवासी आहे. मुंबईत राहणाऱ्या समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख याला राजस्थानच्या कोटामधून ताब्यात घेण्यात आलं आहे. तो सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता.

जान मोहम्मद शेखचे मित्र असलेले फय्याज हुसैन यांनी सांगितले की, मी त्याला लहानपणापासून ओळखतो. त्याला 12 सप्टेंबरला शेवटचं भेटलो होतो. आम्ही एकत्र चहाही प्यायलो, तो ड्रायव्हर म्हणून काम करतो, जेव्हा आम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळाली, तेव्हा आम्हाला धक्का बसला, अशी प्रतिक्रिया हुसैन यांनी दिली. फय्याज यांनी सांगितलं की त्यांना दिल्ली पोलिसांकडून फोन आला होता. दिल्ली पोलिसांनी जान मोहम्मदविषयी चौकशी केली आणि फय्याजबद्दलही पूर्ण माहिती घेतली. 13 तारखेला जान मोहम्मदने आपल्याला फोन केला होता, पण दोघेही बोलू शकले नव्हते, असंही फय्याज यांनी सांगितलं.

जान मोहम्मदला पत्नी आणि दोन मुली आहेत. त्यांनाही सध्या मुंबई पोलिसांनी धारावी पोलीस स्टेशनमध्ये नेले असून त्यांची चौकशी केली जात आहे. धारावी पोलीस ठाण्यासमोर स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

जान मोहम्मद शेख कोटा येथून दिल्लीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. जान मोहम्मद शेख हा कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याही संपर्कात होता, अशी माहिती मिळत आहे. सहा संशयितांना पाकिस्तानातून प्रशिक्षण मिळत असल्याची माहिती आहे. देशभर सण-उत्सवांची धामधूम सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवून खळबळ उडवून देण्याची दहशतवादी योजना असल्याचं समोर आलं आहे.