Desh

माझा दुसरा मुलगाही भारतमातेसाठी देण्यास तयार पण…शहीद जवानाच्या वडिलांचा आक्रोश

By PCB Author

February 15, 2019

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३९ जवान शहीद झाले असून २० जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. पाकिस्तानला धडा शिकवला दावा अशी मागणी शहीद जवानांच्या कुटुंबीयांकडून होत आहे.

हल्ल्यात शहीद झालेले सीआरपीएफचे जवान रतन ठाकूर यांच्या वडिलांनीही पाकिस्तानला योग्य उत्तर दिले पाहिजे अशी मागणी केली आहे. भारतमातेच्या सेवेसाठी मी माझ्या मुलाचे बलिदान दिले आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, ‘भारतमातेच्या सेवेसाठी मी माझ्या मुलाचे बलिदान दिले आहे. माझ्या दुसऱ्या मुलालाही मी सीमारेषेवर पाठवणार आहे. माझा दुसऱा मुलगाही भारतमातेसाठी देण्यास तयार आहे, पण पाकिस्तानला योग्य उत्तर दिले गेले पाहिजे’.

या हल्ल्याने देशभर संतापाची लाट उसळली असून या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा गर्भित इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. आदिल दार असे आत्मघातकी हल्ला चढविणाऱ्या अतिरेक्याचे नाव आहे. तो दक्षिण काश्मीरमधील काकेपुराचा आहे. २०१८मध्ये तो जैश ए महम्मदमध्ये सामील झाला होता.