“माझं नाव दाऊद पहिल्यापासूनही कधी नव्हतं आणि आत्ताही नाही”; समीर वानखेडेंच्या वडिलांचं स्पष्टीकरण

0
272

मुंबई, दि.२६ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचा दावा केला होता. मात्र, समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी हा दावा फेटाळून लावला होता. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी आणखी एक छायाचित्र ट्विट करुन वानखेडे पिता-पुत्रांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका फेसबुकचा प्रोफाईल पिक्चर शेअर केला आहे. यामध्ये समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांचे छायाचित्र दिसत आहे. मात्र, या प्रोफाईलवर वानखेडे दाऊद असे नाव लिहले आहे. त्यामुळे ज्ञानदेव वानखेडे की दाऊद वानखेडे या संभ्रमात आणखीनच भार पडली आहे.

तत्पूर्वी ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांच्या सर्व आरोपांचे खंडन केले होते. माझं नाव दाऊद पहिल्यापासूनही कधी नव्हतं. आताही नाही. जन्मल्यापासून माझं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे आहे. शाळेत जाण्यापासून, कॉलेजला जाण्यापासून, एलएलबीला प्रवेश घेण्यापासून, डिपार्टमेंटला जाण्यापासून, रिटायर होण्यापासून माझं नाव ज्ञानदेव वानखेडे आहे. हे कुणीतरी गैरवापर करुन किंवा बनावट केलं असेल, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही किंवा माहितीही नाही, असे स्पष्टीकरण समीर वानखेडे यांच्या वडिलांनी दिले होते.

समीर वानखेडेच्या जन्माच्या दाखल्यावर वडिलांचे नाव दाऊद आहे. त्यांचा धर्म मुस्लिम आहे. त्या दाखल्यावर खोडखोड केलीय. हा दाखला खोटा असेल तर खरा दाखला कोणता आहे? त्यांनी समोर आणावा. समीर वानखेडेच्या वडिलांनी धर्मांतर केलं. दोन मुलं जन्माला आली. त्यांचे जन्माचे दाखले आले आणि त्यांनतर वडिलांनी धर्मांतर लपून ठेवलं. नोकरी केली तिथे कोणताही पुरावा दिला नाही, असं मलिक यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसात धर्माच्या आड घेऊन प्रचार सुरू झाला होता. पण लोकांना माहीत नव्हतं हा व्यक्ती जन्मापासून आजपर्यंत मुस्लिम आहे. ते तपासात पुढे येईल, असंही मलिक म्हणाले.

वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर यांनी या धर्मांतराच्या आरोपावर उत्तर दिलं आहे. क्रांती रेडकर यांनी ट्विटरवर त्यांच्या विवाहाचा फोटो पोस्ट करून कमेंट केली आहे. मी आणि माझे पती समीर जन्मापासून हिंदू आहोत. आम्ही कधीच धर्मांतर केले नाही. आम्ही सर्वच धर्माचा आदर करतो. समीरचे वडीलही हिंदू आहे. माझी सासू मुस्लिम होती. आता ती या जगात नाही. समीरचं पहिलं लग्न स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत झालं होतं, असंही क्रांतीने सांगितले.