‘माझं नाव घेतल्याशिवाय मुश्रीफ साहेबांना झोप लागत नाही’: पाटलांचा मुश्रीफांना टोला

0
187

मुंबई, दि.१३ (पीसीबी) : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्याला हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं. मात्र, त्याचवेळी हसन मुश्रीफ यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील टीका केली. त्यावरून आता चंद्राकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांच्यावर पलटवार केला आहे. “माझं नाव घेतल्याशिवाय मुश्रीफ साहेबांना झोप लागत नाही. ते आमचे चांगले मित्र आहेत. आपल्या मित्राला आपलं नाव घेतल्यानंतर चांगली झोप लागत असेल, तर मित्रासाठी त्याला माझी हरकत नाही”, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला आहे.

हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना खोचक सल्ला दिला आहे. “हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय की किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा दावा ठोकणार. पण ही त्यांची कार्यपद्धती आहे. अलिकडच्या काळात इतके घोटाळे समोर येतात, की १०० कोटींचा दावा ही फार छोटी रक्कम आहे. त्यांनी जरा ५००, १००० कोटी रुपयांचा दावा ठोकला पाहिजे. शिवाय अब्रू नुकसानीचा दावा करायला कोर्टात स्टॅम्पसाठी विशिष्ट रक्कम भरावी लागते. तेवढे व्हाईट पैसे आहेत का हे पाहावं. कारण ब्लॅक मनी तिथे चालत नाही. मग हा पैसा स्वत: भरणार की वर्गणी काढणार, हेही त्यांनी सांगावं”, असं पाटील म्हणाले.

“महाराष्ट्रात आम्ही हॅम नावाचा ऐतिहासिक प्रकल्प केला, ज्याच्या रस्त्यांचं काम पूर्ण झाल्याचे कार्यक्रम हे करत फिरत आहेत. त्या हॅममध्ये घोटाळा आहे असं जर मुश्रीफांचं म्हणणं आहे, तर १९ महिने काय तुम्ही झोपा काढत होतात का? आत्ता तुम्हाला जाग आली का? त्यांना हॅमविषयी तक्रार करायची असेल, तर काही अडचण नाही. १९ महिन्यांत करण्यासारखं खूप होतं. कोविडमध्ये पैसे खाण्याशिवाय दुसरं काम नव्हतं. त्या काळात हे करता आलं असतं”, असं देखील पाटील म्हणाले. मी धमक्यांना घाबरत नाही. तुमची काही चूकच नसेल, तर घाबरण्याचं काय कारण? असा सवाल देखील त्यांनी केला.

“सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणतात. यात कसला प्रयत्न? तुम्ही खूप खमके आहात ना. तुम्ही एकमेकांना आसा फेविकॉल लावलाय की तो हलवण्याची कुणाची हिंमत नाही. रोज जयंत पाटील, सुप्रिया सुळे म्हणतात की २५ वर्ष हे सरकार टिकणार आहे. मग घाबरण्याचं कारण नाही”, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे.