माजी सैनिकाची प्रश्नांची सरबत्ती; अजित पवारांनी घेतला गावातून काढता पाय    

0
576

बारामती, दि. ३० (पीसीबी) – पेट्रोलपंपासाठी शिफारस न केल्यामुळे एका माजी सैनिकांने राष्ट्रवादी नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रश्नाची सरबत्ती केली. अखेर शाब्दीक चकमक वाढत असल्याचे लक्षात येताच याबाबत आपली जबाबदारी नसल्याचे सांगत अजित पवारांनी तेथून काढता पाय घेतला.

अजित पवारांनी तालुक्यातील दुष्काळी गावांचा दौरा केला. या दरम्यान त्यांनी उंडवडी सुपे या गावाला भेट दिली. यावेळी ज्ञानदेव गवळी या वयोवृध्द माजी सैनिकांने २२ वर्षापूर्वी आपल्याला गावलगत पेट्रोलपंप मंजूर झाल्याची आठवण करून दिली. मात्र, वजनदार नेत्यांच्या शिफारशी नसल्याने हा विषय रखडलेला आहे, असे सांगत त्यांनी अजित पवारांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

यावर पेट्रोलपंप मंजुरीचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित येत आहे. त्यामुळे याबाबतची जबाबदारी केंद्राची आहे. आपल्याशी याचा काहीही संबंध नाही, असे सांगत अजितदादांनी तेथून कलटी मारली. पवार गावातून गेल्यानंतर या विषयाची चर्चा दिवसभर गावात सुरू होती.