‘माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय विद्यार्थी दिवस’ घोषित करा’

0
740

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा ‘राष्ट्रीय विद्यार्थी दिवस’ म्हणून घोषीत करण्यात यावा अशी मागणी माजी राज्यसभा खासदार आणि भाजपा नेते आनंद भास्कर रापोलू यांनी केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री रमेश निशांक यांच्याकडे केली आहे. कलाम हे एक आदर्श वैज्ञानिक होते त्यांच्या प्रेरणेने भारतीय विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यता जागृत व्हावी यासाठी आपला हा प्रयत्न असल्याचे रापोलू यांनी म्हटले आहे.

रापोलू यांनी यासंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना एक पत्र लिहीले आहे. यामध्ये ते लिहीतात की, अमेरिकेने यापूर्वीच १५ ऑक्टोबर हा डॉ. कलामांचा जन्मदिवस ‘जागतिक विद्यार्थी दिवस’ म्हणून घोषीत केला आहे. त्यानुसार, देशभरातील विद्यापीठांमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्येही हा दिवस ‘जागतीक विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण २१ जून हा ‘जागतीक योग दिवस’ आणि ७ ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ म्हणून घोषीत केला आहे. त्याचप्रमाणे आता १५ ऑक्टोबर हा ‘राष्ट्रीय विद्यार्थी दिवस’ म्हणून घोषीत करावा, अशी माझी केंद्र सरकारकडे विनंती असल्याचे रापोलू यांनी म्हटले आहे.