Maharashtra

माजी खासदार दामू शिंगडा यांचे निधन

By PCB Author

May 03, 2021

मुंबई, दि. ३ (पीसीबी) : काँग्रेसचे माजी खासदार दामोदर शिंगडा यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. 1979 मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकून त्यांच्या कारकिर्दीला प्रारंभ केला होता. 1980 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली. 1980, 1984, 1989, 1991 आणि 2004च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या दामू शिंगडा यांनी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदाची धुरा अनेक वर्ष सांभाळली होती.

दामू शिंगाडा यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1954 रोजी झाला. ऐशींच्या दशकात त्यांनी राजकारणात प्रवेश केला. डहाणूचे तत्कालीन महापौर शशिकांत बारी यांचा त्यांना पाठिंबा होता. 1980 मध्ये वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी ते खासदार म्हणून निवडून आले. दीर्घकाळ काँग्रेसमध्ये राहिल्यामुळे ते गांधी घराण्याच्या अत्यंत मर्जीतील होते. शेतकऱ्यांची बाजू लावून धरणारा नेता म्हणून दामू शिंगडा यांची ओळख होती. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी सलोख्याचे संबंध असल्याने त्यांना अजातशत्रू म्हटले जात असे.

माजी खासदार दामू शिंगडा यांच्या निधनाने पालघर ठाणे जिल्ह्याचा सुमारे पाच दशकांचा सामाजिक राजकीय दुवा निखळला आहे. ते वक्ते नव्हते परंतू खासगी बैठकीत फड गाजवणारे नेते होते. त्यांचा मुत्सद्दीपणा त्यांच्या विरोधकांनासुद्धा मान्य केला होता. इंदिरा गांधी त्यांना लिटल खासदार म्हणत असत. वयाच्या 25 व्या वर्षी क्रिकेट खेळत असताना त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर ते सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून आले. सलग पाचवेळा लोकसभेवर निवडून जाणाऱ्या दामू शिंगाडा यांना 2009 साली पराभवाचा धक्का बसला. अपक्ष उमेदवार बळीराम जाधव यांनी त्यांचा पराभव केला. त्यावेळी वसई-विरार पट्ट्यात प्रभाव असलेल्या हितेंद्र ठाकूर यांनी आपली ताकद बळीराम जाधव यांच्या पाठिशी उभी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही दामू शिंगडा यांना पाठिंबा द्यायला नकार दिला. या सगळ्याची परिणती दामू शिंगडा यांच्या पराभवात झाली.