Desh

माजी क्रिकेटपटू रॉबिन सिंहचा रवी शास्त्रींवर निशाणा

By PCB Author

July 29, 2019

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – माजी क्रिकेटपटू रॉबिन सिंहने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला असून, त्याने विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींवर निशाणा साधला आहे. शास्त्री प्रशिक्षकपदावर असताना, भारतीय संघ दोन विश्वचषक स्पर्धांमधील उपांत्य लढतीत पराभूत झाला आहे. त्यामुळे आताच प्रशिक्षणाच्या रचनेत बदल करणे गरजेचे आहे, असे रॉबिन प्रशिक्षकाच्या भूमिकेविषयीही रॉबिन सिंहने अनेक मते मांडली. ‘तुमची स्वतःची मानसिक तयारी असावी लागते. संघ आणि खेळाडू ज्या परिस्थितीचा सामना करतात, त्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. संघासाठी तयार केलेल्या योजनांमध्ये सहभागी व्हावे लागते. तांत्रिकदृष्ट्या खेळ समजून घेतला तरच, तुम्ही हे सर्व करू शकता,’ असे रॉबिन म्हणाला.

मीडिया रिपोर्टनुसार, रवी शास्त्री यांच्याकडेच टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपवली जाऊ शकते. रॉबिनही प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहे. १३६ एकदिवसीय सामन्यांत रॉबिनने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २००७-०८मध्ये त्याने भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपद सांभाळले होते. आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सचे सहायक प्रशिक्षकपदही भूषवले आहे.