माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना ईडीकडून अटक  

0
434

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांची तिहार जेलमध्ये ईडीच्या तीन सदस्यांच्या टीमकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना आज (बुधवारी) सकाळी अटक करण्यात आली आहे. मंगळवारी विशेष न्यायालयाने ईडीला पी चिदंबरम यांची चौकशी तसेच अटकेची परवानगी दिली होती. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी पी चिदंबरम ५ सप्टेंबरपासून तिहार जेलमध्ये आहेत.

यावेळी तिहार जेलमध्ये चिदंबरम यांचा मुलगा आणि काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम, पत्नी नलिन उपस्थित होते. ईडीने पी चिदंबरम यांच्या अटकेची मागणी केली होती. यावर न्यायालयाने त्यांना चौकशीची परवानगी दिली. तसेच चौकशीदरम्यान हाती लागलेल्या माहितीच्या आधारे अटक करण्याचा निर्णय ईडी घेऊ शकते, असेही सांगितले होते.

दरम्यान, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणातील आरोपीविरोधात जर सबळ पुरावे असतील, तर ईडी अटक करु शकते. यामध्ये न्यायालयाने मध्यस्थी करण्याची गरज नाही.  पण आरोपी आधीच एखाद्या प्रकरणात अटकेत असेल तर चौकशीसाठी परवानगी घेणे गरजेचे आहे,  असे विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी  सांगितले होते.