Desh

माजी आयएएस अधिकारी शाह फैझल यांना विमानतळावर ताब्यात घेऊन काश्मीरला पाठवले

By PCB Author

August 14, 2019

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी)- माजी आयएएस अधिकारी शाह फैझल यांना बुधवारी दिल्ली विमातनळावर ताब्यात घेऊन पुन्हा काश्मीरला पाठवण्यात आले. शाह फैझल यांना देश सोडण्यापासून रोखण्यात आले. त्यांना आता काश्मीरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. माजी आयएएस अधिकारी राहिलेल्या शाह फैझल यांनी केंद्रावर जोरदार टीका करताना काश्मीरमधील ८० लाख लोकसंख्या कैदेत असल्याचे म्हटले होते.

काश्मीर अभूतपूर्व अशा निर्बंधाचा अनुभव घेत असून झीरो ब्रिजपासून विमानतळापर्यंत काही गाडया दिसत आहेत. अन्य भागांमध्ये बंदी आहे असे फैझल म्हणाले. ते जम्मू-काश्मीरमधील पीएमपी पक्षाचे अध्यक्ष आहेत. कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचा काश्मीरमधील लोकांना धक्का बसला आहे. आम्ही जे गमावले त्याबद्दल प्रत्येकजण दु:खात आहे. लोकांबरोबर माझी जी चर्चा झाली त्यातून त्यांना प्रचंड दु:ख झाल्याचे जाणवले.

भारताने विश्वासघात केल्याच्या नजरेतून या निर्णयाकडे पाहिले जात आहे असे शाह फैझल यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायावर त्यांनी काश्मीरच्या प्रश्नाकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप केला.