Maharashtra

मागासवर्गीय अहवालाची वाट न बघता मराठा आरक्षण द्या – उध्दव ठाकरे

By PCB Author

July 30, 2018

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – मागासवर्गीय अहवालाची वाट न बघता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे,   अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) येथे  स्पष्ट केली. सध्याचे आरक्षण रद्द न करता, आर्थिक निकषावर आरक्षण द्या पण सध्याचे आरक्षण रद्द करु नका, अशी मागणीही उद्धव यांनी यावेळी केली.

राज्यभरात मराठा आरक्षणावरून वातावरण तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबईत शिवसेनेने बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेनेचे आमदार, मंत्री आज संध्याकाळी ४ वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

मराठा समाजाने आज आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळेच या आंदोलनाची सरकारने गंभीरपणे दखल घेतली आहे. मराठा समाज शांततेने आरक्षणाची मागणी करत होता. तोपर्यंत त्याकडे सरकारने लक्ष दिले नाही. मराठा आरक्षणासाठी तातडीने अधिवेशन बोलवा, घटनादुरुस्ती करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणीही  उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.