महेश भट्ट यांनी कंगनाला चप्पल मारली होती; बहीण रंगोलीचा आरोप

0
450

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – आपल्या सडेतोड वक्तव्य आणि तितक्यांच बोचऱ्या मतांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना रणौत तिच्या टीकेची तोफ कधी कोणावर डागेल हे सांगता येत नाही. या वादामध्ये आता आलियाची आई सोनी राजदान आणि कंगनाची बहीण रंगोलीने उडी घेतली आहे. विशेष म्हणजे या आरोप- प्रत्यारोप सुरु असताना चित्रपट दिग्दर्शक महेश यांनी कंगनाला एकेकाळी चप्पल फेकून मारल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा वाद मिटण्याऐवजी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

कंगनाने आलियावर टीका केल्यानंतर सोनी राजदान यांनी ट्विटरच्या माध्यमातून कंगनाला उद्देशून खोचक टीका केली होती. ‘महेश भट यांनी कंगनाला चित्रपटामध्ये ब्रेक दिला. पण हीच कंगना सतत महेश भट यांच्यावर, पत्नी व मुलीवर टीका करतेय. यावर मी काय बोलू ? हे असे सारे करण्यामागे तिचा हेतू तरी काय? ’,असे ट्वीट सोनी राजदान यांनी केले होते. त्यांचे हे ट्विट पाहिल्यानंतर रंगोलीने त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

“मुळात महेश भट्ट यांनी कंगनाला चित्रपटामध्ये ब्रेक दिला हा भ्रम दूर करा. कंगनाला खरा ब्रेक अनुराग बासू यांनी दिला आहे. ज्या चित्रपटातून कंगनाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, त्या चित्रपटामध्ये महेश भट्ट केवळ क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून काम करत होते. इतकेच नाही तर महेश भट्ट यांनी कंगनाला धोखा चित्रपटासाठी विचारले होते. मात्र या चित्रपटासाठी तिने नकार दिल्यानंतर महेश भट्ट यांनी कंगनाला बरेच काही खरे-खोटे सुनावले. विशेष म्हणजे ते इतक्यावरच थांबले नाहीत. तर ‘लम्हे’ चित्रपटाच्या प्रिव्ह्युदरम्यान त्यांनी कंगनाला चप्पल सुद्धा फेकून मारली होती. यावेळी कंगना केवळ १९ वर्षांची होती. या वयात मनावर असा आघात झाल्यानंतर कंगना ती रात्रभर रडत होती. तिचा चित्रपट तिलाच पाहू दिला नव्हता आणि त्यात तिला अपमानित करुन बाहेरदेखील काढण्यात आले होते”, असे प्रत्युत्तर रंगोलीने सोनी यांना दिले.