महिलेच्या निष्काळजीपणामुळे किरकटवाडीतील पाचशे लोकवस्तीची सोसायटी धोक्यात

0
341

पुणे, दि 5 (पीसीबी) : कोरोना संसर्ग वाढत असताना हातावर क्वारंटाइनचा शिक्का असताना बिबवेवाडी येथून किरकटवाडीत आलेल्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या एका महिलेच्या निष्काळजीपणामुळे किरकटवाडीतील जवळपास पाचशे लोकवस्ती असलेली सोसायटी धोक्यात आली आहे. सदर ३० वर्षीय महिला बिबवेवाडी येथे तिच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी गेली होती. तिचे आई-वडील पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्या महिलेला तेथेच क्वारंटाइनचा शिक्का मारून वेगळे राहण्यास सांगितले होते.

परंतु, ती तेथून कोणालाही न कळवता किरकटवाडी येथील तिच्या घरी आली. तिच्या घरच्यांनीही ही माहिती स्थानिक प्रशासनापासून लपवली. काल या महिलेला त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते.

तेथे कोरोना चाचणी केली असता आज या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून या महिलेच्या घरातील आठ व्यक्तींना तपासणीसाठी पाठवण्याची व्यवस्था केली आहे, इतर संपर्कातील व्यक्ती शोधण्याचे काम प्रशासनाने सुरू केले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात व खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉक्टर वंदना गवळी यांच्याकडून देण्यात आली.

या बाबत माहिती मिळताच हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके व प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉक्टर वंदना गवळी यांनी संबंधित सोसायटीचा परिसर सील केला आहे. किरकटवाडी ग्रामपंचायतीला परिसर निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यावेळी किरकटवाडी गावचे सरपंच गोकुळ करंजावणे, उपसरपंच नरेंद्र हगवणे व इतर काही सदस्यही उपस्थित होते. लॉकडाउन शिथील झाल्यानंतर किरकटवाडी, खडकवासला, नांदेड या परिसरामध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सध्या हवेली पोलिस ठाणाच्या हद्दीत नांदेड येथे एक, खडकवासला येथे तीन व किरकटवाडी येथे एक अशी अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाच झाली आहे. सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या तपासणीनंतर हा आकडा वाढण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. एका व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. नागरिकांनी नियमांचे पालन करावे. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळलीच पाहिजे, असे आवाहन पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांच्याकडून करण्यात आले.