Maharashtra

महिलेकडे मुख्यमंत्रिपद देण्यासाठी पुण्याच्या तरूणाचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

By PCB Author

January 07, 2019

मुंबई, दि. ७ (पीसीबी)  –  राज्याच्या मुख्यमंत्रिपदी महिला असावी, यासह इतर मागण्यांसाठी पुण्यातील एका तरूणाने मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न आज (सोमवार) केला. मात्र, इमारतीखाली  लावण्यात आलेल्या  संरक्षक जाळीत पडल्याने सुदैवाने तो  सुखरूप आहे.

लक्ष्मण चव्हाण असे या तरुणाचे नाव आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी महिला असावी, यासह इतर  मागण्यांसाठी त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे सांगितले जात आहे.  दरम्यान, मी भारत प्रजा सत्ता नावाची संस्था चालवत आहे.  राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एखादी महिला असावी, राज्यात चांगले रस्ते असावेत आणि मला नोकरी मिळावी, अशा माझ्या मागण्या आहेत, असे चव्हाणने सांगितले.

या घटनेची माहिती मंत्रालयात पसरताच  त्याला पाहण्यासाठी नागरिक आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. चव्हाण जोरजोरात घोषणा देत होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला खाली उतरवले. त्यानंतर त्याला मरिन ड्राइव्ह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.