महिला पत्रकाराने केलेल्या ट्विटला अश्लील भाषेत उत्तर दिल्याने एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

0
681

 

नाशिक, दि.४ (पीसीबी) – नाशिक येथील महिला पत्रकाराने केलेल्या ट्विटला अश्लील भाषेत उत्तर दिल्याने विजयराज जाधव नावाच्या व्यक्ती विरोधात ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणाची स्वतः राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेऊन पोलिसांना कारवाईच्या सुचना केल्या होत्या.

याबाबत माहिती अशी कि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाबद्दल या महिला पत्रकाराने ट्विट केले होते. त्यांच्या ट्विटला नाशिक येथील विजयराज जाधव याने अर्वाच्च व अश्लील भाषेत उत्तर दिले होते.

याबाबत संबंधित पत्रकार महिलेने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, पोलिस महासंचालक यांपासून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंह यांच्यापर्यंत तक्रार केली. या तक्रारीनंतर संबंधीत ट्विटची राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी दखल घेतली. त्यांनी या प्रकरणात पोलिसांना दखल घेण्याची सूचना केली.

गृहमंत्र्यांच्या सूचनेनुसार सुत्रे वेगाने हालली आणि विजयराज जाधव याच्यावर कारवाईसाठी दबाव वाढला. त्यानंतर पोलिसांनी त्यास उमराने (ता. देवळा) येथून ताब्यात घेऊन ओझर (निफाड) पोलीसांच्या ताब्यात दिले. ओझर पोलिसांनी जाधव याला अटक केली.

त्याची वैद्यकीय चाचणी केली असता त्याचा रक्तदाब वाढल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. विजयराज जाधव याच्यावर कलम 354 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे पुढील तपास करीत आहेत.

काही माध्यमांनी जाधव हा भाजपच्या आय टी सेलचा सदस्य आहे असं म्हटलं होतं. परंतु भाजपने पत्रक काढून सदर व्यक्तीचा भाजपशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.