महिला उद्योजिकेला मारहाण प्रकरणी आंदोलकांचे रविवारपासून आमरण उपोषण; पुणे ग्रामीण पोलिस बड्या बिल्डरांच्या पाठीशी

0
920

पुणे, दि. २९ (पीसीबी) – बड्या बिल्डरांनी मारहाण आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई व्हावी यासाठी पाषाण येथील पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाची पोलिसांनी कोणतीच दखल घेतलेली नाही. त्यामुळे मारहाण आणि आर्थिक फसवणूक झालेल्या महिला उद्योजिका काकोली मंडल यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबांसह रविवारपासून (दि. ३०) उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी सरसरळ बड्या बिल्डरांना पाठीशी घालून या आंदोलनाकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे आता हे आंदोलन चिघळण्याची शक्यता असून, पोलिस एखाद्याचा जीव गेल्यानंतरच बड्या बिल्डरांवर गुन्हा दाखल करणार आहेत का?, असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख निर्माण केलेले पोलिस अधीक्षक संदिप पाटील हे सुद्धा बड्या बिल्डरांच्या दबावापुढे झुकल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.     

पुण्यातील कुमार डेव्हलपर्सच्या वतीने मांजरी खुर्द येथे कुलनेशन या नावाने गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. हे काम महिला उद्योजिका काकोली मंडल यांच्या ए. एम. सी. कॉन्ट्रॅक्टर्स यांना देण्यात आले होते. परंतु, केलेल्या कामाचे पैसे अदा करण्यासाठी कुमार डेव्हलपर्सचे मालक ललितकुमार जैन यांनी वारंवार टाळाटाळ केली. तसेच ए. एम. सी. कॉन्ट्रॅक्टर्सच्या कामागारांना वारंवार धमकावणे, खोटे अदखलापत्र गुन्हे दाखल करणे व इतर माध्यमातून त्रास देण्यास सुरूवात करण्यात आली. त्यामुळे काकोली मंडल यांनी याप्रकरणी १७ एप्रिल २०१८ रोजी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. परंतु, पोलिसांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही.

दरम्यान, काकोली मंडल यांनी स्वतः केलेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी कुलनेशन गृहप्रकल्पाच्या ठिकाणी गेल्या असता कुमार बिल्डर्सचे मालक हेमकार ललितकुमार जैन, सॉलिटर कंपनीचे अतुल चोरडिया, ट्रायकॉन कंपनीचे ब्रिजेश सिंग, व्हीटीपी ग्रुपचे संतोष जैन, साईटवरील अभियंत्यांनी त्यांना धक्काबुक्की करत धमकी दिली. तसेच अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्यांच्या दोन वर्षांच्या मुलालाही मारहाण करण्यात आली. या सर्व घटनेचे चित्रीकरण करून लोणीकंद पोलिस ठाण्यात पुन्हा १९ जुलै २०१८ रोजी तक्रार करण्यात आली. परंतु, पोलिसांनी या प्रकरणात आजपर्यंत काहीच कारवाई केली नाही.

त्यामुळे रिपब्लिकन युवा मोर्चा व समविचारी सामाजिक संघटनांचे १७ सप्टेंबरपासून पुण्यातील पाषाण येथील ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात स्वतः काकोली मंडल आणि त्यांचे कुटुंबियही सहभागी आहेत. कुमार बिल्डर्सचे मालक ललितकुमार जैन, सॉलिटर कंपनीचे मालक अतुल चोरडिया, व्हीटीपी ग्रुपचे मालक संतोष जैन, ट्रायकॉन कंपनीचे ब्रिजेश सिंग तसेच गोळीबार करणारा संजूसिंग रामेश्वरसिंग व इतर कर्मचाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी या आंदोलकांची मागणी आहे. तसेच या प्रकरणात दोनवेळा तक्रार करूनही गुन्हा दाखल न करणाऱ्या लोणीकंद पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी आंदोलकांची आहे.

आंदोलनाच्या एक-दोन दिवसांनंतर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदिप पाटील यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली. त्यानंतर संदिप पाटील यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. परंतु, ते हवेतच विरले. त्यानंतर आंदोलकांनी संदिप पाटील यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा केली. त्यावेळी पाटील यांनी गणेश विसर्जनानंतर गुन्हा दाखल करण्याचे दुसऱ्यांदा आश्वासन दिले. परंतु, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून गवगवा झालेले संदिप पाटील हे सुद्धा बड्या बिल्डरांच्या दबावापुढे झुकून दिलेले आश्वासन पाळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे संदिप पाटील यांच्या कर्तव्यदक्षपणाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत पीडित महिला काकोली मंडल यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबांसह पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर रविवारपासून (दि. ३०) आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.