महिला उद्योजिकेला मारहाण; बड्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ, आंदोलनाचा सहावा दिवस

1016

पुणे, दि. २२ (पीसीबी) – महिला उद्योजिका काकोली मंडल यांना मारहाण व आर्थिक फसवणूक करणाऱ्या बड्या बिल्डरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पाषाण येथील ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर सहाव्या दिवशीही आंदोलन सुरू आहे.

पुण्यातील कुमार डेव्हलपर्सच्या वतीने मांजरी खुर्द येथे कुलनेशन या नावाने गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. हे काम महिला उद्योजिका काकोली मंडल यांच्या ए. एम. सी. कॉन्ट्रॅक्टर्स यांना देण्यात आले होते. परंतु, केलेल्या कामाचे पैसे अदा करण्यासाठी कुमार डेव्हलपर्सचे मालक ललितकुमार जैन यांनी वारंवार टाळाटाळ केली. तसेच ए. एम. सी. कॉन्ट्रॅक्टर्सच्या कामागारांना वारंवार धमकावणे, खोटे अदखलापत्र गुन्हे दाखल करणे व इतर माध्यमातून त्रास देण्यास सुरूवात करण्यात आली. त्यामुळे काकोली मंडल यांनी याप्रकरणी १७ एप्रिल २०१८ रोजी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. परंतु, पोलिसांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही.

दरम्यान, काकोली मंडल यांनी स्वतः केलेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी कुलनेशन गृहप्रकल्पाच्या ठिकाणी गेल्या असता कुमार बिल्डर्सचे मालक हेमकार ललितकुमार जैन, सॉलिटर कंपनीचे अतुल चोरडिया, ट्रायकॉन कंपनीचे ब्रिजेश सिंग, व्हीटीपी ग्रुपचे संतोष जैन, साईटवरील अभियंत्यांनी त्यांना धक्काबुक्की करत धमकी दिली. तसेच अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्यांच्या दोन वर्षांच्या मुलालाही मारहाण करण्यात आली. या सर्व घटनेचे चित्रीकरण करून लोणीकंद पोलिस ठाण्यात पुन्हा १९ जुलै २०१८ रोजी तक्रार करण्यात आली. परंतु, पोलिसांनी या प्रकरणात आजपर्यंत काहीच कारवाई केली नाही.

त्यामुळे रिपब्लिकन युवा मोर्चा व समविचारी सामाजिक संघटनांच्या वतीने १७ सप्टेंबरपासून पुण्यातील पाषाण येथील ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. कुमार बिल्डर्सचे मालक ललितकुमार जैन, सॉलिटर कंपनीचे मालक अतुल चोरडिया, व्हीटीपी ग्रुपचे मालक संतोष जैन, ट्रायकॉन कंपनीचे ब्रिजेश सिंग तसेच गोळीबार करणारा संजूसिंग रामेश्वरसिंग व इतर कर्मचाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. तसेच या प्रकरणात दोनवेळा तक्रार करूनही गुन्हा दाखल न करणाऱ्या लोणीकंद पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी आंदोलकांची आहे.

आंदोलकांनी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदिप पाटील यांच्याशी आतापर्यंत दोनवेळा चर्चा केली. पहिल्या चर्चेवेळी पाटील यांनी लोणीकंद पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांशी फोनवरून संपर्क साधला. तसेच या प्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला. प्रत्यक्षात पोलिसांनी काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे आंदोलकांनी शुक्रवारी (दि. २३) रात्री पुन्हा पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली. त्यानंतर पोलिस अधीक्षक संदिप पाटील यांनी गणेश विसर्जनानंतर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले आहे. परंतु, आंदोलकांनी गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत माघारी न हटण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पाषाण येथील पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर सहाव्या दिवशीही आदोलन सुरूच ठेवले आहे.