महिलांच्या गळयातील मंगळसूत्र हिसकावणा-या दोन सराईत इराणी चोरट्यांना अटक

0
263

– 12 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त, 17 गुन्ह्यांची उकल

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दोन सराईत इराणी चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 12 लाख 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे 17 गुन्हे उघडकीस आले आहेत. हे चोरटे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेत होते.

सफिर फिरोज खान वय 35, रा. दत्तवाडी सिंहगड कॉलेजरोड, लोणावळा पुणे), मोहम्मद उर्फ डॉन शाबुद्दीन इराणी (वय 25, रा. शिवाजीनगर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार आशिक बोटके, निशांत काळे व प्रदीप गोडांबे यांना माहिती मिळाली की, चेन चोरी करणारे दोन चोरटे एका काळ्या रंगाच्या नंबर नसलेल्या अपाची मोटार सायकलवरुन देहूफाट्याकडून मोशीच्या दिशेने येत आहेत. त्यानुसार पोलिसांनी डुडुळगाव येथे सापळा लावला आणि साफिर आणि मोहम्मद यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे तपास करत असताना पोलिसांनी 11 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, 1 लाख 65 हजारांच्या दोन दुचाकी असा एकूण 12 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे चोरटे स्वतः पोलीस असल्याचे भासवून, दुचाकीवरून पाठलाग करून सोनसाखळी चोरी करायचे. चोरलेल्या वाहनांचा उपयोग करून हे चोऱ्या करत होते. त्यांचा आणखी एक साथीदार असून त्याच्यासोबत मिळून हे चोरटे चोऱ्या करत होते.

या कारवाईमुळे वाकड, सागवी व देहुरोड पोलीस स्टेशन मधील प्रत्येकी तीन, चिंचवड दोन, चिखली, एमआयडीसी भोसरी, दिघी, तळेगाव दाभाडे, चाकण तसेच गंगाखेड (परभणी) पोलीस स्टेशन मधील प्रत्येकी एक असे चेन चोरीचे 14 गुन्हे, पोलीस बतावणी एक गुन्हा व वाहन चोरीचे दोन गुन्हे एकूण 17 गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपी सफिर फिरोज खान हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे विरुध्द पुणे शहर, पुणे ग्रामीण येथे दरोडा व जबरी चोरीचे 22 गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी मोहम्मद उर्फ डॉन शाबद्दीन इराणी याचे विरुध्द पुणे शहर, पुणे ग्रामीण येथे जबरी चोरी व वाहन चोरीचे 9 गुन्हे दाखल आहेत

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहा पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील व शाकीर जिनेडी तसेच पोलीस अंमलदार अशोक दुधवणे, गणेश हजारे, निशांत काळे, शकुर तांबोळी, आशिष बोटके, प्रदीप गोडावे, किरण काटकर, सुधीर डोळस, सुनिल कानगुडे,गणेश गिरीगोसावी, विजय नलगे, संदीप पाटील, शैलेश मगर, आशोक गारगोटे,प्रदीप गुट्टे, तांत्रिक विश्लेषण विभागातील राजेंद्र शेटे, नागेश माळी व वाकड पोलीस स्टेशनचे जावेद पठाण यांच्या पथकाने केली.