महाशिवआघाडी होऊ नये यासाठी भाजप प्रयत्न करतंय- पृथ्वीराज चव्हाण

0
651

मुंबई,दि.१३ (पीसीबी)- शिवसेनेसोबत आमची आघाडी होऊ नये म्हणून भाजप पूर्ण प्रयत्न करत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठीची चर्चा पुढे नेण्यासाठी ग्रीन सिग्लन दाखवला आहे. त्यानंतर आता काँग्रेसने शिवसेनेशी पुढील चर्चा सुरू केली आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या दृष्टीकोनातून चर्चा करण्यासाठी सोनिया गांधींनी हिरवा कंदील दाखवला आहे. यानंतर शिवसेनेशी औपचारिक चर्चा सुरू झाली. शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विषय आला, तेव्हा सोनिया गांधींनी यावर व्यापक चर्चा केली. मात्र, तेव्हा शिवसेना एनडीएचा घटक होता, त्यामुळे चर्चा करणे शक्य नव्हते. शिवसेना एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू झाली.

ते पुढे म्हणाले की, शरद पवारांनीही उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत औपचारिक चर्चा केली. पण पाठिंब्याचं पत्र द्यायला तोपर्यंत उशीर झाला होता. पवारांनीही म्हटलं की आधी सर्व चर्चा करू आणि पुढे जाऊ. पवारांनी सोनिया गांधी यांना हा सल्ला दिला. त्यानंतर आम्हीही ठरवलं पुढे कसं जायचं ते चर्चा करून ठरवू. अन्यथा सरकारमध्ये जाऊन नंतर चर्चा करणं शक्य नव्हतं. त्यामुळे काँग्रेसचा ढिसाळपणा, वेळ काढला अशी टीका योग्य नव्हती, असे चव्हाण म्हणाले.

त्यांनी म्हटले की, आमच्या आघाडीचा संयुक्त जाहीरनामा आणि शिवसेनेचा वचननामा घेऊन त्यातील कोणते मुद्दे घ्यायचे कुठले वगळायचे ते ठरवावे लागेल. किमान समान कार्यक्रम तयार करताना वादग्रस्त मुद्यांचे काय करायचे हे ठरावावे लागणार आहे. सोनिया गांधींनी जेव्हा हिरवा कंदील दाखवला त्यानंतर औपचारिक चर्चा सुरू झाली आहे. पहिल्यांदा किमान समान कार्यक्रमाबाबत चर्चा करावी लागेल. आधी याबाबत आमच्या पक्षात चर्चा करू, त्यानंतर राष्ट्रवादीशी चर्चा करू, असे ते म्हणाले.