महावितरणला शाब्बासकी,२४ तासात पुणे, पिंपरीसह ग्रामीणमध्ये वीजपुरवठा सुरळीत

0
333

पुणे, दि.4 (पीसीबी) : ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा पुणे परिमंडलातील वीजयंत्रणेला अभूतपूर्व तडाखा बसला असून प्राथमिक अंदाजानुसार पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच प्रामुख्याने मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव या चार तालुक्यांमध्ये उच्च व लघुदाबाचे 1440 वीजखांब जमीनदोस्त झाले आहेत. तसेच अनेक ठिकाणी झाडे व फांद्या पडून वीजतारा तुटल्या आहेत.

दरम्यान, महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी अविश्रांत दुरुस्ती कामे करून गेल्या 24 तासांमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह ग्रामीण भागातील बहुतांश वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. संततधार पाऊस, चक्रीवादळ निघून गेल्यानंतरही सुरु असलेला सोसाट्याचा वारा आणि शहरी भागात अनेक भूमिगत वाहिन्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे वीजपुरवठा सुरु करण्यात अनेक अडथळे आले. मात्र आज पहाटेपर्यंत बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरु करण्यात आला.
पुणे शहरात वादळी वारे व मुसळधार पावसामुळे सुमारे 45 उच्च व लघुदाबाचे वीजखांब कोसळले. वीजतारांवर झाडे व फांद्या पडल्याने शेकडो ठिकाणी वीजतारा तुटल्या होत्या. काल सायंकाळी उशिरा पावसाचा वेग ओसरला तरी वारे वेगान वाहत होते. मात्र महावितरणचे सर्व अभियंते, कर्मचारी तसेच कंत्राटदारांचे कर्मचाऱ्यांनी लगेचच दुरुस्ती कामाला सुरवात केली. पहाटेपर्यंत दुरुस्ती तसेच पर्यायी व्यवस्थेद्वारे टप्प्याटप्प्याने बहुतांश भागात वीजपुरवठा सुरु केला.

भूमिगत वाहिन्या व फिडर पिलरमध्ये पाणी शिरणे, मोठी झाडे व फांद्या हटविण्यास विलंब होणे आदी कारणांमुळे गुरुवारी दुपारपर्यंत आंबेगाव, सहकारनगर व मार्केटयार्डमधील काही भाग, जनता वसाहत, बाणेरमधील काही भाग, येवलेवाडीमधील फॉर्च्यून सृष्टी, फॉर्च्यून शुभम, पद्मकुंज, हडपसरमधील गंगा व्हीलेज, विमाननगर व विश्रांतवाडीमधील काही सोसायट्या आदी भागांमध्ये वीजपुरवठा खंडित होता. सायंकाळी उशिरा किंवा रात्रीपर्यंत या सर्व भागात वीजपुरवठा सुरु करण्यात येत आहे. शहरात काल 85 पैकी 84 वीजवाहिन्यांवरील वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. मात्र सुमारे 47 रोहित्रांवरील वीजपुरवठा बंद आहे. रोहित्रांच्या दुरुस्तीसोबतच अनेक भागातील वीजपुरवठा खंडित असल्याच्या वीजग्राहकांच्या वैयक्तिक तक्रारी निवारणाचे काम वेगाने सुरु आहे.

पिंपरी चिंचवड व भोसरीमध्ये वादळी पावसामुळे वीजयंत्रणेला मोठा तडाखा बसल्याने 45 ठिकाणी वीजखांब कोसळले. चार ठिकाणी रोहित्र जमीनदोस्त झाले. अनेक ठिकाणी वीजतारा तुटल्या. त्यामुळे 112 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. यामध्ये आज पहाटेपर्यंत अविश्रांत दुरुस्ती काम करुन बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरु करण्यात आला. दुपारपर्यंत हिंजवडी, वाकडचा काही भाग, खराळवाडीमधील काही सोसायट्या, पिंपळे सौदागरचा काही भाग तसेच भोसरीमधील काही भागात वीजपुरवठा सुरु करण्यासाठी दुरुस्ती कामे सुरु होती. सायंकाळी किंवा रात्री उशिरापर्य़ंत या सर्व भागात वीजपुरवठा सुरुर करण्यात येत आहे.

‘निसर्ग’ चक्रीवादळाचा पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांमधील वीजयंत्रणेला अभूतपूर्व तडाखा बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार झाडे, फांद्या पडल्याने उच्चदाबाचे 390 व लघुदाबाचे 960 असे सुमारे 1350 वीजखांब जमीनदोस्त झाले आहेत. शेकडो ठिकाणी वीजतारा तुटल्या आहेत. यात महावितरणचे सुमारे 20 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या तालुक्यांमधील 385 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडल्यामुळे 794 गावांमधील सुमारे 5 लाख 57 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. या चक्रीवादळामुळे महापारेषणच्या पाच अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्या तुटल्या होत्या.

पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी वीजयंत्रणेची पाहणी व दुरुस्ती कामाला वेग देण्यासाठी ग्रामीण भागात आज विविध ठिकाणी भेटी दिल्या. महापारेषणकडून काल रात्रीच तुटलेल्या पाचही अतिउच्चदाब वीजवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आली. तसेच महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या सुमारास दुरुस्ती कामाला वेग दिला. दुपारपर्यंत लोणावळा, तळेगाव शहर व ग्रामीण परिसर, तसेच आंबेगाव, जुन्नरमधील काही गावे आणि कोकणजवळील माले गावाचा परिसर (ता. मुळशी), वेल्हा परिसर आदी ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु होते. या भागातील 7 उपकेंद्र बंद आहेत. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा बंद असलेल्या लोणावळा, तळेगावसह इतर बहुतांश भागात वीजपुरवठा सुरु करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.