महावितरणच्या ‘वेबिनार’मध्ये 920 उद्योजकांशी थेट संवाद वीजपुरवठा, बिलिंगबाबतचे प्रश्न सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य

0
312

पुणे, दि. 2 (पीसीबी) : औद्योगिक व महत्वाचे उच्चदाब वीजग्राहक हे महावितरणसाठी महत्वाचे आहे. कोरोनाच्या सावटामुळे बंद असलेले उद्योग व मोठे व्यवसाय हळूहळू सुरु होत आहे. त्यामुळे या ग्राहकांकडे विशेष लक्ष देऊन अखंडित वीजपुरवठा करण्यासोबतच बिलिंगसंदर्भातील प्रश्न तत्परतेने सोडविण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही पुणे प्रादेशिक संचालक (प्र)अंकुश नाळे यांनी वेबिनार संवादात दिली.

पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजक तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, मोठे मॉल्स व व्यावसायिक इतर असे महत्वाचे मोठे वीजग्राहक यांच्यासाठी गेल्या आठवड्याभरात महावितरणकडून व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध प्रश्नांवर चर्चा व संवादाचे आयोजन केले होते. यामध्ये पुणे जिल्हयातील सुमारे 280 वीजग्राहकांसह पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे 920 उद्योजक व महत्वाचे मोठे ग्राहक सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी थेट संवाद साधला. यावेळी मुख्य अभियंता सचिन तालेवार व सुनील पावडे, मराठा चेंबर्स आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष डी. जी. करंदीकर, असोशिएट संचालक  एस. एम. गाडगीळ, फेडरेशन आॅफ चाकण इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्री. दिलीप बटवाल, बारामती मॅन्यूफॅक्चरींग असोशिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, सणसवाडी डेक्कन चेंबर्सचे सुरेश संचेती, जेजुरी एमआयडीसीचे अध्यक्ष रामदास खुटे, उद्योजक  दीपक कामत,  गजानन लुपाने आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांशी संवाद साधण्यासाठी वेबिनार किंवा व्हीडीओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी दिले होते. त्याप्रमाणे उद्योजक व महत्वाच्या मोठ्या वीजग्राहकांसाठी प्रादेशिक कार्यालय स्तरावर वेबिनार संवादाचे आयोजन करण्यात आले. यात चाकण, भोसरी, पिंपरी, हिंजवडी, हडपसर, मुळशी, शिक्रापूर, जेजुरी, बारामती, रांजणगाव, सणसवाडी आदी भागातील 255 उद्योजक तसेच महत्वाचे मोठे 27 ग्राहक सहभागी झाले होते.

या वेबिनारमध्ये पुणे जिल्ह्यातील एमआयडीसी व उद्योग परिसरात विविध योजनांमधून झालेली व प्रस्तावित वीजयंत्रणांची कामे आदींसह नवीन वीजदर निश्चितीकरणात उद्योगांसाठी असणारी सवलत, स्वतंत्र वेबपोर्टल, विविध ग्राहकसेवा आदींची सादरीकरणातून माहिती देण्यात आली. तसेच केडब्लूएचऐवजी केव्हीएच प्रणालीनुसार सुरु असलेली बिलींग आकारणी, लॉकडाऊन कालावधीतील स्थिर आकाराबाबत विविध प्रश्नांचे व शंकांचे प्रादेशिक संचालक (प्र.)  नाळे यांच्याकडून निरसन करण्यात आले. यावेळी उद्योजकांनी उपस्थित केलेले वीजपुरवठा व बिलींगबाबत विविध प्रश्न, अडचणी व समस्यांचा प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे जागेवरच आढावा घेतला व त्याच्या निराकरणासाठी अधिकाऱ्यांना विविध उपाययोजनांचे आदेश दिले.

वेबिनारद्वारे थेट संवाद साधून विविध प्रश्न व समस्या निकाली काढण्याच्या महावितरणच्या उपक्रमाचे उद्योजकांनी स्वागत केले व समाधान व्यक्त केले. यापुढे प्रादेशिक कार्यालय स्तरावर दर तीन महिन्यांनी वेबिनार आयोजन करून उद्योग व महत्वाच्या ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यात येईल, असे प्रादेशिक संचालक (प्र.) नाळे यांनी सांगितले. या वेबिनारमध्ये पुणे जिल्ह्यातील उद्योगांचे संचालक, प्रतिनिधी आदींसह महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, पंकज तगलपल्लेवार, प्रकाश राऊत, चंद्रशेखर पाटील आदींसह अभियंते व अधिकारी उपस्थित होते.