महाविकास आघाडी सरकार ऊठसूठ केंद्राकडे बोट दाखवून तोंडाला पाने पुसते – आमदार लक्ष्मण जगताप

0
458

पिंपरी, दि. २२ – कोरोनामुळे राज्यातील मजूर, कामगार, श्रमिक, शेतकरी, खाजगी कार्यालयांमध्ये काम करणारे नोकरदार तसेच लघु उद्योजक अशा सर्वांना पुन्हा शून्यातून सुरूवात करावी लागणार आहे. या सर्वांसमोर पोट भरण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

त्यांच्यासाठी राज्य सरकारकडून काही तरी मदत जाहीर होईल आणि कोरोनमुळे उद्‌ध्वस्त झालेले आयुष्य सावरण्यासाठी सामान्यांना आधार मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेची घोर निराशा केली आहे. ऊठसूठ केंद्राकडे बोट दाखवायचे आणि राज्यातील ११ कोटी जनतेच्या तोंडाला पाने पुसायची एवढाच उद्योग या सरकारकडून सुरू आहे. राज्यातील सर्वसामान्यांचा आक्रोश सरकारच्या कानावर पोहोचावा आणि उशिरा का होईना सरकारने जागे होऊन जनतेच्या भल्यासाठी पॅकेज जाहीर करावे या मागणीसाठी आज (शुक्रवार) भाजपने “माझे आंगण, माझे रणांगण” हे आंदोलन केल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.

आमदार जगताप यांनी आपल्या दोन कार्यकर्त्यांसह पिंपळेगुरव येथील जनसंपर्क कार्यालयाजवळ उभे राहून महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन केले. “उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार” असा फलक त्यांनी हातात घेतला होता. तसेच पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या घराच्या अंगणात, गॅलरीमध्ये तसेच कार्यालयाजवळ उभे राहून सरकार विरोधात आंदोलन केले.

या आंदोलनासंदर्भात बोलताना आमदार गताप म्हणाले, “राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर तो आटोक्यात आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. आज देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यासाठी सरकारचे अयोग्य नियोजन जबाबदार आहे. सरकारच्या मंत्र्यांमध्ये कोठेही एकवाक्यता दिसत नाही. सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमध्ये गडबड गोंधळ असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अशा महासंकटाच्या काळात सरकारचे निर्णय गोंधळलेले असल्यास जनतेमध्येही गोंधळ निर्माण होतो. तशी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष म्हणून भाजपने आतापर्यंत राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य केले आहे. त्याचा गैरसमज होऊन राज्यातील जनतेला होणारा त्रास सरकारला दिसत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.