Maharashtra

महाविकास आघाडी सरकारने आमदारांना दिल्या सूचना

By PCB Author

February 25, 2020

मुंबई, दि.२५ (पीसीबी) – राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर आज (ता. २५) विधानभवनात शिवसेना , कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांची संयुक्त बैठक पार पडली.

यावेळी उद्धव ठाकरे, अजित पवार आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. सध्या सीसीए, एनआरसी व एनपीआर च्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रश्नावर अकारण आक्रमक होण्याचा विरोधकांचा मानस आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व आमदारांनी त्याकडे दुर्लक्ष करत वादग्रस्त वक्तव्य टाळावीत. जे राष्ट्रीय मुद्दे आहेत त्यावर तिन्ही पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांमधे चर्चा होत असतात. राज्य विधीमंडळात त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही. असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी आमदारांच्या समोर स्पष्ट केले.