“महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोशीतील विजेचा प्रश्न सोडविणार” – धनंजय आल्हाट

0
251

पिंपरी,दि. 5 (पीसीबी)- “मोशी भागातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. महापालिकेच्या माध्यमातून सब स्टेशनसाठी महावितरणला जागा उपलब्ध करून दिली पाहिजे होती. जनतेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी काम करणे आवश्यक होते. परंतु, केवळ स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मोशीकरांवर ही परिस्थिती उदभवली असल्याचे सांगत महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोशीतील विजेचा प्रश्न सोडविणार असल्याचे” शिवसेनेचे भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट यांनी सांगितले. आमची जनतेशी बांधिलकी असल्याने आंदोलन केले. महापालिकेत लोकांचे प्रतिनिधित्व करत असलेल्या भाजपला आंदोलन करायला कोणी रोखले होते, भाजपची जनतेशी बांधिलकी नाही का, असा सवालही त्यांनी केला.

मोशी भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. माजी नगरसेवक अरुण बो-हाडे, माजी नगरसेविका मंदा आल्हाट, योगेश बोराटे, संजय लडकत, रुपाली आल्हाट, विकास साने, कविता आल्हाट, अतिष बारणे, नितीन सस्ते, गणेश सस्ते, राहुल बनकर, संतोष बोराटे, दिलीप बो-हाडे, ज्ञानेश्वर बो-हाडे, केदार गव्हाणे, मोरेश्वर आल्हाट, गोकुळदास आल्हाट, आशिष आल्हाट, मयूर कुदळे, रोहित आल्हाट, गणेश आल्हाट आदी कंदील मोर्चात सहभागी झाले होते.

शिवसेनेचे भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट म्हणाले, “शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला नेहमी सांगत होते की भावना आणि बांधिलकी जनतेशी असली पाहिजे. सरकार कोणाचेही असू द्यात. जनतेसाठी नेहमी रस्त्यावर उतरले पाहिजे असे आदेश आम्हाला त्यांचे असायचे. विजेच्या समस्येने नागरीक त्रस्त असून त्यांच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. आम्ही जनसामान्यांसाठी काम करतो. त्यांचे प्रश्न सोडविणे आमचे कर्तव्य आहे. मोशीतील विजेचा अत्यंत महत्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी प्रयन्त करणे गरजेचे होते. परंतु, महापालिकेत लोकांचे प्रतिनिधित्व करत असलेल्या भाजपला लोकांच्या विजेच्या प्रश्नासाठी आंदोलन करण्यापासून कोणी रोखले होते का, त्यांचे हात कोणी धरले होते का, यातून त्यांची बांधिलकी जनतेशी नसल्याचे दिसून येते”.

“या भागातील सर्व लोकप्रतिनिधी भाजपचे आहेत. भाजपने साडेचार वर्षात काय केले. मोशी भागात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार लोकप्रतिनिधींनी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. महापालिकेच्या माध्यमातून महावितरणला जागा उपलब्ध करून दिली पाहिजे होती. त्यासाठी पाठपुरावा करणे लोकप्रतिनिधींचे काम आहे. जनतेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी काम करणे आवश्यक होते. परंतु, केवळ स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मोशीकरांवर ही परिस्थिती उदभवली आहे. या परिसरातील प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना आम्ही एकत्रित येऊन प्रश्न सोडविणार असल्याचे” आल्हाट यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित गव्हाणे म्हणाले, “महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना अजितदादांच्या नेतृत्वाखाली 20 वर्षे शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. मोशी भागातीलही विकास झालेला आहे. या भागाचा झपाट्याने विकास झाल्याने लोकवस्ती वाढली. त्यामुळे काही समस्या निर्माण झाल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाणी, विज या समस्येकडे लक्ष घालण्याची गरज होती. परंतु, मागच्या साडेचार वर्षांत या समस्यांकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. या भागात गृहनिर्माण संस्था, सदनिका, घरे वाढत आहेत. या अनुषंगाने लोकप्रतिनिधींनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत वारंवार बैठक घेणे आवश्यक होते. त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या अडचणी, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना काही मदत करून प्रश्न मार्गी लावणे अपेक्षित होते. परंतु, हे झाले नाही. विजेच्या प्रश्नामुळे नागरिकांना अडचणी येत आहेत”.

“महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जातील. उपमुख्यमंत्री अजित पवार दर शुक्रवारी पुण्यामध्ये असतात. त्यांना भेटून मोशीतील विजेचा प्रश्न सोडवण्याची विनंती करणार आहे. दादा या विषयात निश्चितपणे लक्ष घालतील. महावितरणच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्या अडचणी समजून घेतील आणि या भागातील विद्युत, पाणी प्रश्न सोडविल्या जाईल. मोशीमध्ये महाविकास आ घाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे जनतेची कामे केली जात असल्याने” गव्हाणे यांनी समाधान व्यक्त केले.