‘महाराष्ट्र सरकारने लसीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा गाजावाजा करण्यापलीकडे काहीच केले नाही’

0
243

मुंबई, दि.०८ (पीसीबी) : काल नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी देशातील सर्व वयोगटाच्या नागरिकांना मोफत लस देण्याचा घेतलेला निर्णय हा क्रांतिकारी असल्याचे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले. आम्हाला लस विकत घेण्याची परवानगी द्या, अशी मागणी अनेक राज्य करत होती. त्यानुसार दीड महिन्यांपूर्वी तशी परवानगी दिली होती. मात्र, त्यानंतर महाराष्ट्र सरकारने लसीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा गाजावाजा करण्यापलीकडे काहीच केले नाही. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा करुन हा विषयच संपवून टाकला आहे’, असे प्रविण दरेकर यांनी सांगितले.

राज्यांकडून लसपुरवठ्यासंदर्भात आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाही पंतप्रधान मोदी शांतपणे काम करत होते. अखेर सोमवारी त्यांनी केंद्र सरकारच सर्व लसी पुरवेल, असा निर्णय घेतला. यावरुन पंतप्रधान मोदी संवेदनशीलपणे काम करत असल्याचे स्पष्ट होते, असे दरेकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना भेटताना विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलवायला हवे होते. त्यामुळे मदत झाली असती. सत्ताधाऱ्यांना अहंकार असता कामा नये. उद्धव ठाकरे हे आपल्या कोर्टातील मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात ढकलण्यासाठी ही भेट घेत असतील तर या भेटीमधून काहीही साध्य होणार नाही. आरक्षणावर सांगोपांग चर्चा करून समन्वय असला पाहिजे. केवळ जाऊन भेट घेण्यात अर्थ नाही.राज्यपालांना पत्रं दिलं पंतप्रधानांना भेटलं म्हणजे काम संपलं असं असेल तर त्याला अर्थ नाही, असेही प्रविण दरेकर यांनी म्हटले.