महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ‘व्यापमं’सारखा घोटाळा; सत्यजीत तांबेंचा आरोप

0
1016

मुंबई, दि. १२ (पीसीबी) –  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या  परीक्षेत ‘व्यापमं’सारखा घोटाळा झाला आहे,  असा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी  केला  आहे. सरकारने सामूहिक कॉपीला उत्तेजन देण्यासाठी जाणूनबुजून ‘मोबाईल क्रमांक आधारित’ बैठक क्रमांक पद्धत अवलंबल्याचा आरोप तांबेंनी  केला आहे.

१७ फेब्रुवारी २०१९ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे . उमेदवारांना दिलेल्या परीक्षा प्रवेशपत्रातील बैठक क्रमांक हे उमेदवारांच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे दिले आहेत. अशाप्रकारे परीक्षांसाठी बैठक क्रमांक देण्याची पद्धत आयोगाद्वारे २०१७- १८ सालात घेण्यात आलेल्या बऱ्याच परीक्षांसाठी वापरण्यात आली होती, असे तांबेंनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना फॉर्म भरण्यापूर्वी आपली प्रोफाइल तयार करावी लागते. यामध्ये मोबाईल नंबरही भरावा लागतो. २०१७- १८ पासून परीक्षार्थींच्या मोबाईल नंबरचे अखेरचे डिजिट ग्राह्य धरुन त्यांना सीट नंबर दिला जातो.

उमेदवारांनी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ साठी अर्ज करण्यापूर्वी जाणीवपूर्वक एका पाठोपाठ येणारे भ्रमणध्वनी क्रमांक खरेदी केले आणि आपल्याला सोयीच्या असलेल्या उमेदवाराशी मिळती जुळती केल्याचा आरोप सत्यजीत तांबेंनी केला आहे. यामुळे मास कॉपी होण्याची शक्यताही त्यांनी  व्यक्त केली आहे.