Maharashtra

“महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार”

By PCB Author

September 27, 2020

मुंबई,दि.२७(पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोव्हिड परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ‘माझे कुटुंब , माझी जबाबदारी’ मोहीम तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी राज्यातील जिल्ह्यांनी नाविन्यपूर्ण मार्ग अवलंबिले आहेत. त्याचे कौतुक करुन उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

आज औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती विभागातील जिल्ह्यांचे पालकमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांच्या टास्क फोर्समधल्या डॉक्टर्सशी संवाद साधून वैद्यकीय उपचार आणि इतर उपायांच्याबाबतीत चर्चा करावी. पालक सचिव यांनीदेखील याबाबतीत तातडीने त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात समन्वयाच्यादृष्टीने पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासन यांना संपर्कात राहावे, असे ते म्हणाले.

दरम्यान औरंगाबाद जिल्ह्याने दवंडी पिटणे, सकाळी शहरातल्या घंटा गाड्यांमध्ये मोहिमेची आकर्षक जाहिरात करणे, नांदेडचे कोरोना विलगीकरण अभियान, बीडमधील मेळावे, सहव्याधी रुग्णांना शोधण्यावर नाशिकने दिलेला भर इत्यादी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम विविध जिल्हा प्रशासन राबवीत आहे. मुख्यमंत्र्यांनी याचे कौतुक केले आणि मोहीम मनापासून आणि दर्जेदार पद्धतीने चालवा अशीही सूचना केली.