”महाराष्ट्रात हजारो कोंबड्यांची केली जाणार कत्तल”

0
282

परभणी, दि. १2 (पीसीबी) : बर्ड फ्लूचं संकट महाराष्ट्रात गहिरं होत असताना परभणीत 8 हजार, तर राज्यात 80 हजार कोंबड्यांची कत्तल केली जाणार आहे. महाराष्ट्रात 1200 पक्ष्यांचा बर्ड फ्लूने घास घेतल्याचं स्पष्ट झाल्यानंतर राज्य सरकारने पक्ष्यांना ठार करण्याचे आदेश दिले होते. त्यातच मराठवाडा बर्ड फ्लूचं केंद्र होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. परभणी जिल्ह्यातील गावातून कोंबड्यांच्या कत्तलीला सुरुवात होणार आहे. जवळपास वीस पोल्ट्री फार्म्समधील 80 हजार कोंबड्या स्वाहा केल्या जाणार.

मुंबई, ठाण्यासह 11 जिल्ह्यात आतापर्यंत बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळला आहे. यामुळे 1200 पक्ष्यांना प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये 1112 कोंबड्या, तर उर्वरितांमध्ये कावळे, कबुतर, बगळे यांचा समावेश होता. मुंबई महानगर पट्ट्यात कावळ्यांसह इतर पक्षी मृतावस्थेत आढळल्याने चिंता वाढली होती.
परभणी जिल्ह्यातील मुरुंबा येथे बर्ड फ्लूमुळे 800 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल भोपाळच्या प्रयोगशाळेकडून प्राप्त झाल्यानंतर सेलू तालुक्यातील कुपटा गावातील मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. मुरुंबापाठोपाठ कुपटा गावाचा 10 किमी परिसरही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

कुपटा परिसरात पोल्ट्री नसली तरी जोडधंदा म्हणून शेतकरी कुक्कुटपालन करतात. त्या ठिकाणच्या कोंबड्या दगावल्याने जिल्ह्यात अन्य ठिकाणी बर्ड फ्लूची लागण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने हालचाली सुरु केल्या. जिथे बर्ड फ्लू आढळून आला आहे, त्या ठिकाणासह आसपासच्या एक किलोमीटरच्या परिसरातील कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत. तसेच या परिसरात नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
बर्ड फ्लूच्या अहवालानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी 8 हजार कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिले होते. मुरुंबा गावात पशु विभागाची टीम दाखल दाखल झाली. कोंबड्या गाडण्यासाठी जागेचा शोध सुरु आहे. गावालगत पूर्णा नदी असल्याने मृत कोंबड्या पुरण्यासाठी अडचणी येत आहेत.