महाराष्ट्रात लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक ?; मोदींचा मुख्यमंत्र्यांना तयारीला लागण्याचा आदेश  

0
1587

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी ला सुरूवात केली आहे. भाजपने निवडणुकीच्या तयारीसाठी कंबर कसली असून लोकसभेसोबत काही राज्यातील विधानसभांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.  त्यानुसार, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत, असे समजते.  

महाराष्ट्रासोबतच हरियाणा आणि झारखंड या राज्यांच्या निवडणुकाही लोकसभा निवडणुकीसोबत होण्याची शक्यता आहे. या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे.  लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे परिणाम या राज्यांवर होऊ शकतात. त्यामुळे लोकसभेसोबत विधानसभा घेण्याचा निर्णय मोदींनी घेतल्याचे सांगितले जात आहे. तिन्ही राज्यांतील मुख्यमंत्र्यांना मोदींनी  निवडणुकीच्या  तयारीला लागण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा  करण्यात आलेली नाही.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या तारखा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक आयोगाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोदी सरकारने लोकानुयी निर्णय घेण्याचा धडका सुरू केला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा जोरदार धक्का बसला आहे. याचा धडा घेत भाजपने सावध पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळेच लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुका घेण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्याचे समजते.