महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस – सूत्र

0
584

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची तयारी सुरु झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने असमर्थता दाखवल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संदर्भात संध्याकाळपर्यंत निर्णय घेतला जाईल. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे या संदर्भातला अहवाल पाठवला आहे. त्यामुळे रात्री साडेआठनंतर महाराष्ट्रात कधीही राष्ट्रपती राजवट लागू शकते.

महाराष्ट्रात सत्तस्थापनेचा अभूतपूर्व घोळ निर्माण झाला आहे. भाजपाने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवली. त्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला निमंत्रण दिले. मात्र त्यांना हा दावा सिद्ध करता आला नाही. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिले. आता राष्ट्रवादी काँग्रेस जर रात्री साडेआठ पर्यंत सत्ता स्थापनेचा दावा सिद्ध करु शकली नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असे स्पष्ट होते आहे.

दिल्लीतही घडामोडींना वेग आला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेटची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाराष्ट्रात जो राजकीय पेच निर्माण झाला आहे त्याची चर्चा होऊ शकते. त्यामुळे दिल्लीत काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्स समिटसाठी ब्राझिलला जाणार आहेत. मात्र त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.