महाराष्ट्रात महिन्यात १ लाख कोरोना बाधित वाढले – राजेश टोपे

0
255

मुंबई, दि. २ (पीसीबी) – देशातील सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात असून परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. जून महिन्यात महाराष्ट्रात तब्बल एक लाख कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या १ लाख ८० हजार २९८ इतकी झाली आहे. राज्यात ९ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता, तर १७ मार्च रोजी मुंबईत पहिल्या मृत्यूची नोंद झाली होती.

१ जून रोजी राज्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ७० हजार १३ इतकी होती. ३० जून रोजी ही संख्या १ लाख ७४ हजार ७६१ वर पोहोचली. म्हणजेच एका महिन्यात राज्यात एक लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. दुसरीकडे मुंबईबद्दल बोलायचं गेल्यास १ जून रोजी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ४१ हजार ९९ इतकी होती. ३० जून रोजी ही संख्या ७७ हजार ६५८ वर पोहोचली. एका महिन्यात मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत ३६ हजार ५५९ इतकी वाढ नोंदवण्यात आली.

दरम्यान, राज्यात बुधवारी ५ हजार ५३७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली. “बुधवारी नवीन २ हजार २४३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. एकूण ९३ हजार १५४ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण ७९ हजार ७५ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट मधून दिली.