महाराष्ट्रात आणखी कडक लॉकडाउन होणार का?; या नेत्याने केलं मोठं वक्तव्य

0
658

मुंबई, दि. ११ (पीसीबी) : करोनाचा सर्वाधिक फटका बसल्यानंतर रुग्णसंख्या नवे उच्चांक गाठू लागल्याने राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात न आल्याने ठाकरे सरकारने ३० एप्रिलपर्यंत लागू केलेला लॉकडाउन नंतर १५ एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान राज्यात रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसत असली तरी अद्यापही लस तसंच आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाउनसंबंधी भाष्य केलं आहे.

“उद्या कॅबिनेट असण्याती संभावना आहे. अद्याप त्यासंदर्भात सूचना आलेली नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच कॅबिनेटच्या सदस्यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल. लॉकडाउन किंवा ब्रेक दी चेनअंतर्गत जे निर्बंध लागू करण्यात आले आहेत ते वाढवायचे की कमी करायचे या सर्व गोष्टींसंदर्भातील निर्णय घेतले जाऊ शकतात,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी लगेच पूर्ण लॉकडाउन हटवला जाईल अशी अपेक्षा करु नका म्हटलं आहे. “सगळं लगेच १०० टक्के कमी होणार नाही. निर्बंध हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकेल असे माझा अंदाज आहे. . पण पूर्ण लॉकडाउन काढून १०० टक्के मोकळीक होईल असं होणार नाही. चर्चा होईल आणि मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील,” असं त्यांनी सांगितलं आहे. राज्यात सध्या ११ जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये नाशिक, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक जिल्हे सध्या संपूर्ण लॉकडाउनची तयारी करत आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी लॉकडाउनचा फायदा झाल्याची माहिती दिली आहे. “लॉकडाउनमुळे मुंबई आणि महाराष्ट्राचा फायदा झाला आहे. लॉकडाउनआधी मुंबईची परिस्थिती, रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. दुसरा लॉकडाउन करत असताना तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपली तयारी सुरु होती. जम्बो सुविधा उभारण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरु झाली आहे, कामं सुरु झाली आहेत. महाराष्ट्रात आता रेमडसेविरसाठी पहिल्यासारखी मारामारी नाही,” अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली आहे.