Maharashtra

महाराष्ट्रातील ‘हा’ नेता पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

By PCB Author

May 25, 2019

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत  महाराष्ट्रात काँग्रेसचा  धुव्वा उडाला.  काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही नांदेडची आपली जागा राखता आली नाही. काँग्रेसमध्ये सक्षम नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत माजी काँग्रेस नेते आणि भाजपचे सहयोगी खासदार नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

दरम्यान, काँग्रेसचे बंडखोर नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे  काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत पुढे घेऊन जाणारा आक्रमक नेत्याची  उणीव भासणार आहे. यामुळे राणेंना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन त्यांच्या खाद्यांवर मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. तसेच काँग्रेस राणेंना  मोठे आश्वासन देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात राणे  यांचा दबदबा होता. त्यांच्याकडे राजकीय परिस्थिती हाताळण्याचा मोठा अनुभव आहे.  काँग्रेसला बिकट  परिस्थितीतून राणे बाहेर काढू शकतात, असेही सांगितले जात आहे. तर  राणे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.