Desh

महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात रस नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By PCB Author

July 17, 2020

नवी दिल्ली, दि. १७ (बीपीसी) : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील विविध विषयांवर दोघांची जवळपास दीड तास चर्चा चालली. “ही राजकीय भेट नसून महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात रस नाही” असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं. “यंदा महाराष्ट्रात ऊसाचं पीक वाढलं, शेतकऱ्यांना FRP आणि साखर कारखान्यांना मदत मिळायला हवी, या मागणीसाठी दिल्लीत आलो, अमित शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली” अशी माहिती फडणवीस यांनी भेटीनंतर पत्रकार परिषद घेत दिली. फडणवीसांसह भाजपचे महाराष्ट्रातील चार नेतेही दिल्ली दौऱ्यावर आहेत. 

“यंदा महाराष्ट्रात ऊसाचं पीक वाढलं, शेतकऱ्यांना FRP आणि साखर कारखान्यांना मदत मिळायला हवी, या मागणीसाठी दिल्लीत आलो. कर्जाचं पुनर्गठण, साखर कारखान्यांना मदत, सॉफ्ट लोन, साखर भाव पडणार नाही यासाठी सकारात्मक चर्चा झाली, किमान विक्री दर वाढवण्याची मागणी केली.” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

कृषी मंत्र्यांची भेट घेणार आहोत, केंद्र सरकारकडून साखर उद्योगासाठी योग्य मदत होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. “शरद पवार काय करत आहेत, म्हणून आम्ही करायचं वगैरे अशी स्पर्धा नाही, केंद्रात आमचं सरकार आहे, त्यामुळे ज्या आवश्यक मागण्या आहेत त्या घेऊन आलो आहोत” असं ते म्हणाले.

“अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांचे महाराष्ट्रातील कोरोनास्थितीवर लक्ष आहे. पंतप्रधान मोदींची वेळ मिळाली तर त्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील कोरोना स्थितीची माहिती देईन, काय करता येऊ शकतं याची माहिती देईन” असंही फडणवीस यांनी सांगितलं.

“ही कुठलीही राजकीय भेट नाही, आम्हाला सरकार पाडणे वगैरेमध्ये रस नाही, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, यासाठी ही भेट झाली. अंतर्विरोधाचं हे सरकार चालेल तोपर्यंत चालेल, पडेल तेव्हा बघू काय करायचं” असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

“भाजपची नवी कार्यकारिणी अद्याप तयार झालेली नाही, त्यानंतर संसदीय समिती होईल, त्यामध्ये नियुक्त करण्याचा अधिकार पंतप्रधान, पक्षप्रमुखांचा आहे, माझी नियुक्ती झालेली नाही. देशात काय चालतं, राज्यात काय चालतं हे मला माहिती नाही, मी महाराष्ट्रातील नेता आहे” असंही ते म्हणाले.

“जाहिरातींवर कुणाचेही फोटो छापा, मारामाऱ्या करा, पण लोकांना फायदा झाला पाहिजे असे निर्णय घ्या” असा टोला ‘महाजॉब्स’ पोर्टलवरुन शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये उडालेल्या खटक्यांवरुन फडणवीसांनी लगावला.