महाराष्ट्रातील नागरिकांना इंधनदर दिलासा? अर्थमंत्र्यांचे संकेत

0
1362

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांतून महाराष्ट्रातील नागरिकांना लवकरच दिलासा देण्यात येईल, असे संकेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी येथे दिले.

पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्यांना होणाऱ्या त्रासाची सरकारला जाणीव असून, इंधनाला जीएसटीमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या २८ तारखेला जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व राज्ये सहभागी होणार असून, त्यात यावर निर्णय अपेक्षित आहे. तथापि, या बैठकीत मतैक्य न झाल्यास महाराष्ट्र सरकार सर्वसामान्यांना इंधनदर दिलासा देण्यासाठी योग्य ती पावले उचलेल, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केल्याबाबत विचारले असता मुनगंटीवार म्हणाले की, ‘इंधनादरांबाबत या आधीच्या यूपीए सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर वाढले की आपल्या देशांत इंधनदरांत आपोआप वाढ होते. सरकार त्यात काही करू शकत नाही. मात्र जीएसटी परिषदेची उद्या, शुक्रवारी बैठक होणार आहे.’