Banner News

महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस राबवण्याचे प्रयत्न सुरु -शरद पवार यांचा आरोप

By PCB Author

July 29, 2020

मुंबई. दि. २९ (पीसीबी) – कर्नाटक, मध्यप्रदेश या ठिकाणी भाजपाने ऑपरेशन लोटस राबवलं. त्याचप्रमाणे भाजपा महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस राबवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या भाषणात सांगतात की सरकार पाडण्याचा आमचा विचार नाही. मात्र ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न पडद्याआडून भाजपाकडून केला जातोय, असा खळबळजनक आरोप शरद पवार यांनी केला. सीएनएन न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला आहे. सध्या महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे. तीन पक्षांमध्ये थोडेफार मतभेद जरुर आहेत. मात्र भाजपाविरोधात आम्ही तिन्ही पक्ष म्हणून एकत्र आलो आहोत. आमच्या सरकारला काहीही धोका नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.दरम्यान, शरद पवार यांच्या आरोपामुळे आघाडी सरकरामध्ये मतभेद असल्याचे पुन्हा उघड झाले असून भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

आत्तापर्यंत मी मे महिन्यात हे सरकार पाडलं जाईल असं ऐकलं होतं. त्यानंतर जुलै महिन्याची मुदत देण्यात आली. आता ऑक्टोबरची मुदत दिली जाते आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारला काहीही धोका नाही. आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

 कोरोनाचं संकट हे फक्त भारतावर किंवा महाराष्ट्रावर आलेलं नाही. हे संकट संपूर्ण जगावर आलं आहे. अमेरिकेत जे काही बळी गेले आहेत त्यापेक्षा भारतातलं प्रमाण नक्कीच कमी आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात होतो आहे अशी जी काही टीका होते ती योग्य नाही. मुंबई हे देशाचं मुख्य केंद्र आहे. तिथे बाहेरून येणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. तिथून हा कोरोना पसरला. ठाणे, पुणे या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे विरोधकांचं म्हणणं मला पटत नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.