“महाराष्ट्राच्या वाघाला घरच्यांनीच ‘मरतुकडा’ म्हणावं हे जरा अतिच नाही का?”; भाजप नेत्याची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका

0
193

मुंबई, दि.२६ (पीसीबी) : कडाक्याच्या थंडीत सुद्धा शेतकरी दिल्लीमध्ये शेतीविषयक कायद्यांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना विरोधी पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला. त्यांना पाठिंबा देण्यासाठी भारत बंद सुद्धा पाळण्यात आला. विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन आले. काँग्रेस या कायद्यांना विरोध करणाऱ्या दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्या असलेले पत्र सरकारदरबारी प्रस्तुत केले. एवढ्या साऱ्या गोष्टी घडूनही सत्ताधारी मोदी सरकारवर विरोधकांना म्हणावा तसा दबाव टाकता आलेला नाही. या अपयशाला काँग्रेस कारणीभूत असल्याचं शिवसेनेने म्हंटल आहे. हाच मुद्दा धरत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर भाजपाने जहरी टीका केली आहे.

भाजपने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत त्यांची खिल्ली उडवत म्हणाले आहेत कि,‘सगळे भाजपविरोधक यूपीएत सामील झाल्याशिवाय विरोधी पक्षाचे बाण सरकारच्या वर्मी लागणार नाहीत. प्रियंका गांधी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, ठाकरे सरकार यांना काम करू दिले जात नाही. त्यांची अडवणूक होत आहे. त्याला कारण मरतुकड्या अवस्थेत पडून राहिलेला विरोधी पक्ष!’, अशा आशयाचा अग्रलेख आज सामनातून प्रकाशित झाला. या मुद्द्यावरून भाजपाचे अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टिपण्णी केली. “दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन मरतुकड्या विरोधी पक्षामुळे ‘पेटत’ नसल्याची खंत सामनाच्या अग्रलेखात व्यक्त केली आहे. ही तर कमालच झाली. महाराष्ट्राचा ‘वाघ’ गेले ८ महिने घरी बसून मोदी-शहांवर भडिमार करतोय. मुखपत्रातून आग ओकतोय. त्यालाही घरच्यांनीही ‘मरतुकडा’ म्हणावं हे जरा अतिच नाही का?”

“दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबाबत दिल्लीतील सत्ताधारी कमालीचे बेफिकीर आहेत. सरकारच्या या बेफिकिरीचे कारण देशातील विस्कळीत, कमजोर झालेला विरोधी पक्ष आहे. निपचित पडलेल्या विरोधी पक्षाने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. सरकारच्या मनात विरोधी पक्षाचे अस्तित्वच दिसत नाही. राहुल गांधींच्या विधानांना काँग्रेसही गांभीर्याने घेत नाही, असे कृषी मंत्री नरेंद्र तोमर म्हणाले. आपल्या सर्वोच्च नेत्यांची अशी जाहीर चेष्टा करण्याचे धारिष्ट सत्ताधारी का दाखवतात? यावर काँग्रेसने वर्किंग कमिटीत चर्चा करणे गरजेचे आहे. राहुल गांधी यांची चेष्टा करणाऱ्या कृषी मंत्री तोमर यांनाही देशातील शेतकरी गांभीर्याने घेत नाही ही वस्तुस्थिती आहेच. मात्र तरीही सरकारवर तुटून पडण्यात काँग्रेस कमजोर पडली आहे, हा आक्षेप उरतोच”, असे मत अग्रलेखात मांडण्यात आले आहे. सामनाच्या अग्रलेखात विरोधी पक्षांच्या अपयशाचं खापर काँग्रेसवर फोडण्यात आलं आहे.