महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुन्हा शरद पवार

0
545

 

मुंबई, दि.१३ (पीसीबी)- “शरद पवार यांचं राजकीय युग संपल आहे. पिढी बदलली आहे. पवारांनी केलेलं राजकारण आता जनता स्वीकारत नाही.” हे विधान आहे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. विधानसभा निवडणुकीपूर्वी इंडिया टुडेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं होतं. पण, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा शरद पवारांच्या भोवतीच महाराष्ट्राच्या राजकारणानं फेर धरला. सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडी आणि प्रत्येकाची ‘सिल्व्हर ओक’कडे (शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान) वळणारी पावलं यातून महाराष्ट्राच्या राजकारणातून पवारांना वगळता येत नाही, याचाच प्रत्यय येत आहे.

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेनं ‘एनडीए’तून बाहेर पडत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सोबत पाऊल टाकलं आहे. काँग्रेसही शिवसेनेसोबत जाण्यास तयार झाली. पण, शिवसेना-काँग्रेस एक पाऊल पुढं आली त्यामागेही शरद पवारच आहेत. दोन्ही वेगवेगळ्या विचारधारेच्या पक्षांमध्ये सुवर्णमध्ये काढण्यात शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या भूमिकेमुळेच अशक्य वाटणारे सत्तासमीकरण महाराष्ट्रात उदयाला येत असून, सर्वात जास्त जागा मिळूनही भाजपा ‘वेट अॅण्ड वॉच,च्या भूमिकेत गेला आहे. प्रचारातील टीकेचा भाग सोडला आणि कुणी कितीही हेटाळणी केली तरी आपल्याशिवाय राज्यातील राजकारणाचं पानही हलू शकत नाही, हेच पवारांनी निवडणुकीतून सिद्ध केलं आहे. त्यामुळे ‘सिल्व्हर ओक’ महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले आहे.