महाराणा प्रतापसिंह यांना महापालिकेच्या वतीने अभिवादन पण येथील स्मारकाची सुरक्षा वाऱ्यावरच !

0
342

पिंपरी दि.१३ (पीसीबी)- पराक्रमी योद्धा, कुशल प्रशासक आणि धुरंधर राज्यकर्ता महाराणा प्रतापसिंह यांनी भारताच्या इतिहासात वेगळा ठसा उमटविला असून त्यांची शौर्यगाथा कायम प्रेरणादायी राहील असे प्रतिपादन उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त त्यांच्या निगडी येथील पुतळ्यास उपमहापौर नानी घुले यांनी पुष्षहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड, स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, संतोष मोरे, नगरसदस्या सुमन पवळे, कमल घोलप, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते अशोक इंगळे, श्रीराम परदेशी, गणेश राजपूत आदी उपस्थित होते.

सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त सर्व बांधवांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम परदेशी यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

● निगडीतील महाराणा प्रताप उद्यानाची सुरक्षा कित्येक वर्षापासुन वाऱ्यावरच

महाराणा प्रताप उद्यानाच्या स्थापनेपासुन याठिकाणी आजतागत सुरक्षारक्षकच नेमला नसल्याने या स्मारकाची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याची बाब भाजप कामगार आघाडीचे सरचिटणीस किशोर हातागळे यांनी उजेडात आणुन महापालिकेच्या सुरक्षा विभाग व उद्यान विभागाकडे यासाठी सक्षम पाठपुरावा केला होता, उद्यान विभाग व सुरक्षा विभागाच्या मंजुरीने हे प्रकरण महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे गेले व त्यांनी यावर आक्षेप घेत सुरक्षारक्षकाची मागणी नामंजुर केली व येथील भिजते घोंगडे कायम तसेच ठेवल्याने सुरक्षेचा प्रश्न आजही तसाच कायम आहे, परंतु महाराणा प्रताप स्मारकाचे पावित्र्य भंग झाल्यास याची जबाबदारी आयुक्त घेतील का ? असा थेट प्रश्न हातागळे यांनी प्रशासनाकडे केला आहे.

दोन महिन्यापासुन या उद्यानाचे मुख्य गेट बंद करण्यात आले आहे परंतु मागील बाजूच्या प्रवेशद्वाराने प्रेमी युगुल व मद्यपी याठिकाणी ठान मांडुन बसलेले दिसतात यामुळे येथील सुरक्षारक्षकांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढुन त्वरित या ठिकाणी ०३ सुरक्षारक्षकांची नेमणुक करण्याची मागणी हातागळे यांनी केली आहे.