Maharashtra

महामार्गावर अपघात झाल्यास ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा – दीपक केसरकर

By PCB Author

June 12, 2019

सिंधुदुर्ग, दि. १२ (पीसीबी) –  पावसाळ्यात महामार्गावर अपघात होण्याचे प्रमाण मोठे असते. आता महामार्गावर अपघात झाल्यास आणि त्यात कोणी दगावल्यास महामार्ग ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात खनिज उत्खन्न व महामार्गाच्या सुरक्षेविषयी   बैठक बोलवली होती. यावेळी त्यांनी हे आदेश दिले आहेत. या बैठकीला  खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी, महामार्गा ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी  आदी उपस्थित होते.

पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले की,  महामार्गावर ठेकेदाराने डायव्हर्शनचे बोर्ड योग्य प्रकारे लावून  संभाव्य अपघात टाळण्यासाठी  दक्षता घ्यावी. अपघात झाल्यास ठेकेदारास जबाबदार धरून व त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. महामार्गासाठी टाकलेल्या भरावाची माती रस्त्यावर येऊन चिखल होऊन अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे महामार्गावर माती येणार नाही, याची ठेकेदाराने दक्षता घ्यावी, अशा सुचना केसरकर यांनी यावेळी दिल्या.