महामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला

3080

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त पिंपरी चौकातील आंबेडकरांच्या पुतळ्यावर आज (शनिवार) दुपारी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. महामानवाला अभिवादन करण्यासाठी आंबेडकर चौकात शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सकाळपासून गर्दी केली होती. त्याचबरोबर नागरिकासह महिला, आबालवृध्दांनीही अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली. भीमप्रेमी, आंबेडकर चळवळतील कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे. 

महापौर नितीन काळजे यांनी आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, नगरसेविका सुलक्षणा धर, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चौकातील मैदानात भव्य सभामंडप टाकण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांपासून येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भीम जलसा, भीम पोवडा, व्याख्याने, परिसंवाद यांना आंबेडकर अनुयायींनी चांगला प्रतिसाद दिला.     पिंपरी-चिंचवड शहरासह आजबाजूच्या भागातील आंबेडकर अनुयायी अभिवादन करण्यासाठी पिंपरीत संध्याकाळपर्यंत दाखल होणार आहेत. भीमप्रेमींच्या स्वागतासाठी पालिकेच्यावतीने स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.

तसेच आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तकांचे चौकात स्टॉल लागले आहेत. स्टॉलवर पुस्तके खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. त्याचबरोबर आंबेडकर यांच्या फोटो, पोस्टर्स विक्रीचे स्टॉल लावण्यात आले आहेत. दरम्यान, सायंकाळी शहरातील विविध ठिकाणांहून मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या मिरवणुका चौकात दाखल होणार आहेत. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे कडेकोट नियोजन केले आहे. चौकातील वाहतूक अन्य मार्गांनी वळवण्यात आली आहे.