महापौर माई ढोरे यांच्या पत्राला आयुक्त राजेश पाटील यांनी दाखवली केराची टोपली

0
280

– सायबर हल्ला प्रकरणात जबाबदार कंपनी संचालकाच्याच दुसऱ्या कंपनीकडे महापालिका विभागांसाठी एन्टिव्हायरस यंत्रणा पुरविण्याचे काम सोपवण्यात येणार

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – एन्टिव्हायरस यंत्रणा सक्षम नसल्याने महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पावर सायबर हल्ला झाला आणि मोठ्या प्रमाणावर डेटा इन्क्रिप्ट झाल्याची तक्रार १५ दिवसांपूर्वीच पोलिसात दाखल करण्यात आली. ज्या टेक महिंन्द्रा, क्रिस्टल इंटिग्रेटेड आणि आरसिस इन्फा… कंपनीकडे स्मार्ट सिटीची संपूर्ण जबाबदारी आहे त्यांचा अत्यंत निष्काळजीपणा त्याला कारण ठरला. पोलिस तपासातही या कंपन्याचा बेजबाबदारपणा सिध्द झाला आहे. दुदैव असे की, आता पुन्हा याच कंपनीचे संचालक असलेल्या मे. वोल्कर्सा टेक्नो सोल्युशन्स प्रा. लि., मुंबई या कंपनीला महापालिका भवनातील संगणक व सर्व्हर यंत्रणेकरिता एन्टिव्हायरस यंत्रणा सपोर्ट स्फाफसह खरेदी करण्याचे काम तीन वर्षाकरिता देण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समितीत मांडला आहे. शहराच्या महापौर माई ढोरे यांनी ही संबंधीत निविदा तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आणि त्याला कडाडून विरोध दर्शविला. महापौर माई ढोरे यांनी त्यासंदर्भात एक लेखी पत्र २२ मार्च २०२१ रोजी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले होते, पण त्या पत्राला आयुक्तांनी केराची टोपली दाखवली आहे. कारण निविदा मंजूर करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या विषयपत्रात हा (विषय क्र.२६) मांडण्यात आला आहे. ज्यांना स्मार्ट सिटीचे काम धडपणे सांभाळता आलेले नाही त्यांनाच पुन्हा पूर्ण महापालिकेतील विविध विभागातील संगणक यंत्रणेत एन्टिव्हायरस टाकण्याचे काम देण्याबाबत आता आश्चर्य व्यक्त कऱण्यात येते आहे.

महापालिका संगणक व सर्व्हर यंत्रणेकरिता आवश्यक एन्टिव्हायरस यंत्रणा आणि सपोर्ट स्टाफसह ३ वर्षाकरिता खरेदी करण्यासाठी ई-निविदा (सुचना क्र. ४७/२०२०-२१) मागविण्यात आली होती. त्यात मे. वोल्कर्सा टेक्नो सोल्युशन्स प्रा. लि., मुंबई या कंपनीने दर कमी करून फेरसादर केलेली निविदा ३२ लाख ८८ हजार ही ४५.४७ टक्के कमी (अंदाजित निविदा एकूण ६० लाख ३० हजार रुपये) दराची असल्याने स्विकृत करण्यात आली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीत मागील आठवड्याच्या बैठकीत हा विषय विषयपत्रात आला आहे. बैठक तहकूब झाल्याने त्याबाबतचा निर्णय झाला नाही, आता पुढच्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे.

सर्वात महत्वाचा आणि अत्यंत गंभीर मुद्दा असा आहे की, ज्या मे. वोल्कर्सा टेक्नो सोल्युशन्स प्रा.लि. कंपनीला काम द्यायचे आहे त्या कंपनीचे संचालक आणि सायबर हल्ला ज्यांच्या निष्काळजीपणामुळे झाला त्या टेक महिंद्रा, क्रिस्टल इंटिग्रेटेड आणि आरसिस इन्फा कंपनीपैकी क्रिस्टल कंपनीच्या संचालक याच मे. वोल्कर्सा टेक्नो सोल्युशन्स प्रा.लि. च्या संचालक आहेत. सायबर हल्ल्यात महापालिकेची जगभर मोठी बदनामी झाली. स्मार्ट सिटीचा डेटा बिलकूल सुरक्षित नव्हता, कारण एन्टिव्हायरस यंत्रणाच सक्षम नव्हती आणि कार्यरतही नव्हती, हे पोलिस तपासात समोर आले आहे. सायबर हल्ला कऱणाऱ्यांनी महिनाभर सिस्टम क्रॅक करण्यासाठी प्रयत्न केला होता. याची साधी पुसटशी कल्पनासुध्दा ज्या तीन कंपन्यांकडे संयुक्तपणे जबाबदारी सोपविली त्यांना यत्किंचितही नव्हती. या कंपनीचा निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा अगदी पुराव्याने सिध्द झाला आहे. अशाही परिस्थितीत पुन्हा त्याच कंपनीकडे पुन्हा सुरक्षेचे काम सोपविणे म्हणजे, स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखे आहे. स्मार्ट सिटीचा डेटा ज्या कंपनीला सुरक्षित ठेवता आला नाही ते महापालिकेच्या सर्व विभागांचा डेटा कसा सुरक्षित ठावणार, हा गंभीर प्रश्न आहे.

महापौर माई ढोरे यांनी याच विषयावर २२ मार्च रोजी आयुक्त राजेश पाटील यांना लेखी पत्र दिले होते. त्या पत्रात या विषयासाठी मागविलेल्या निविदा अनुक्रमे या ५२ टक्के आणि ४८ टक्के कमी दराच्या असून शासन निर्णयानुसार त्या अत्यंत चुकिच्या असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. याशिवाय सायबर हल्ला झाला होता आणि त्यात सर्व्हरमधील डेटा इन्क्रिप्ट करण्यात आला. हा डेटा परत हवा असल्यास पैशाची मागणी करण्यात आली आहे. हे प्रकरणा देशात आणि पूर्ण जगभर गाजले. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा अत्यंत कमी किंमतीत पुरवठा करणाऱ्या एन्टिव्हायरस यंत्रणा खरोखर सक्षम असणार आहे का, असा प्रश्न महापौर माई ढोरे यांनी उपस्थित केला आहे. त्यासाठी एल-१ आणि एल-२ निविदा रद्द कऱण्यात यावी, अशी आग्राही मागणी महापौर माई ढोरे यांनी त्यांच्या पत्रात केली आहे.