महापौर बंगल्यात मुख्यमंत्री फडणवीस- उद्धव ठाकरे यांच्यात खलबते

0
701

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची  शनिवारी महापौर बंगल्यात १० ते १५ मिनिटे  भेट झाली. यावेळी नेमकी कोणती चर्चा झाली, याचा तपशील अद्यापही समजू शकलेला नाही. दरम्यान, शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर हे दोन नेते एकत्र गेले नाहीत. त्यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचा शनिवारी स्मृतिदिन होता.  त्यानिमित्त मुख्यमंत्रीही ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्कवर गेले होते. तत्पूर्वी त्यांनी महापौर बंगल्यात जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे समजू शकलेले नाही. त्या नंतर मुख्यमंत्री एकटेच शिवाजी पार्कवर गेले आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन केले.

दरम्यान, उध्दव ठाकरे यांनी सार्वजनिकरीत्या मुख्यमंत्र्यांसोबत एकत्र येणे टाळले. त्यावरून भाजप व शिवसेना यांच्यातील युतीवरून तणाव  असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे शिवाजी पार्कवर  शिवसेना नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.