महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरे यांचे भूमिगत स्मारक

0
745

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक दादरच्या महापौर बंगल्यातच होणार असून या बंगल्याच्या हेरिटेज स्वरुपात कोणताही बदल केला जाणार नाही. हे स्मारक भूमिगत स्वरुपात ९ हजार चौरस फुटांच्या जागेत होणार आहे. स्मारकासाठी बंगल्याच्या परिसरातील झाडेही तोडली जाणार नाहीत.

महापौर बंगला हा ऐतिहासिक बंगला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या स्मारकात गॅलरी, ग्रंथालय, सेमिनार हॉल, व्याख्यान कक्ष आणि अनेक उपयोगी गोष्टी बनवल्या जाव्यात, अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. हा हेरिटेज बंगला २,३०० चौरस फूट जागेवर आहे. स्मारक बनवण्यासाठी हा बंगला लहान पडत होता. पण भूमिगत स्मारक झाल्यास ते ९ हजार चौ. फुटांवर होणार आहे.

हा बंगला १९२८ साली बांधण्यात आला होता. मुंबई वारसा संवर्धन समितीने अलीकडेच बंगल्याची पाहणी केली होती. समिती स्मारकाच्या नव्या आरखड्यावर समाधानी आहे. कारण नव्या आरखड्यामध्ये मूळ बंगल्याचे बांधकाम अबाधित राहणार आहे. पालिकेने हा बंगला १९६२ मध्ये विकत घेतला होता.