महापौरांनी ६ फ्लॅट बळकावल्याचा आरोप; हायकोर्टाने दिले दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश

0
390

मुंबई,दि.२४(पीसीबी) – भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरुद्ध मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या जनहित याचिकेची दखल घेत हायकोर्टाने आज संबंधितांना दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. एसआरए प्रकल्पात महापौर पेडणेकर यांनी सहा सदनिका बळकावल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी याचिकेत केलेला आहे.

वरळीमधील गोमाता जनता एसआरए प्रकल्पात लाभार्थी नसतानाही किशोरी पेडणेकर यांनी जवळपास सहा सदनिका बेकायदेशीर पद्धतीने बळकावल्या आणि त्या सदनिकांच्या पत्त्यांवर कंपन्याही स्थापन केल्या, असे किरीट सोमय्या यांनी आपल्या याचिकेत नमूद केले आहे. या याचिकेची मुंबई हायकोर्टाने दखल घेतली असून किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिका व एसआरए प्राधिकरणाला याबाबत दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

किरीट सोमय्या यांनी याचिकेत गंभीर आरोप केले आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेकायदेशीर पद्धतीने सहा सदनिका बळकावल्या व याच पत्त्यावर अनेक कंपन्या स्थापन केल्या असून या संपूर्ण भ्रष्टाचाराची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई सुरू करण्याचे आदेश द्यावेत आणि त्यांना नगरसेविका म्हणून अपात्र घोषित करण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेशही द्यावेत, अशी विनंती किरीट सोमय्या यांनी याचिकेत केली आहे.