महापालिकेने कुदळवाडीत नवीन विद्युत खांब बसवले पण जुने खांब हटवले नाहीत

489

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कुदळवाडी परिसरात नवीन विद्युत खांब उभारण्यात आले आहेत. परंतु, नवीन विद्युत खांब बसवताना जुने खांब न काढता आहे तसेच ठेवण्यात आले आहेत. महापालिकेच्या विद्युत विभागाच्या या भोंगळ कारभाराबाबत स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना जागेवर बोलवून घेत जुने विद्युत खांब काढून घेऊन त्याचा योग्य ठिकाणी वापर करण्याची सूचना केली.

शहरात रात्रीच्या वेळी दिवाबत्तीची व्यवस्था करणे महापालिकेचे काम आहे. त्यामुळे महापालिकेमार्फत शहरातील सर्व भागात रस्त्याकडेने विद्युत खांब उभारून त्यावर एलईडी दिवे लावले जातात. चिखलीतील कुदळवाडी परिसरातही अशा प्रकारची व्यवस्था पुरवण्यात आली आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाने कुदळवाडी परिसरातील विद्युत खांब जुने झाल्याने प्रत्येक ठिकाणी नवीन विद्युत खांब उभारले आहेत. त्यावर एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत.

त्यामुळे या भागातील नागरिकांची चांगली सोय झाली आहे. परंतु, नवीन विद्युत खांब बसवल्यानंतर तेथील जुने विद्युत खांब काढून नेणे अपेक्षित होते. परंतु, महापालिकेच्या विद्युत विभागाने नवीन विद्युत खांब बसवले असले, तरी जुने विद्युत खांब आहे त्याच जागेत तसेच ठेवले आहेत. विद्युत विभागाच्या या भोंगळ कारभाराबाबत स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना जागेवर बोलावून घेतले. जुन्या विद्युत खांबाचाही उपयोग होऊ शकतो. त्यामुळे हे खांब काढून घेत त्यांचा इतरत्र योग्य उपयोग करावा, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.