महापालिकेत सत्ता राबवायला अपयशी ठरलो आहे का ? सीमा सावळेंचा संतप्त सवाल

0
715

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण भरले आहे. तरीही शहराला मुबलक आणि सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पाणी प्रश्न गहन झाला आहे. सर्वपक्षीय नगरसेवक या प्रश्नांवर व्यथा मांडत आहेत. तरीही प्रशासन ढिम्म झाले असून अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्यामुळे महापालिकेत  सत्ता राबवायला अपयशी ठरलो आहे का ? असा संतप्त सवाल स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण  सभा आज (बुधवार) झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.

शहरात ७ ऑगस्टपासून पाणीकपात मागे घेण्यात येऊन दररोज पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. परंतु तांत्रिक कारण देत पाणीपुरवठा विभागाने पुन्हा सोमवारपासून (दि.१२) शहरात आठवड्यातून एक दिवसाआड पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. यावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभेत तीव्र संताप व्यक्त केला.

सीमा सावळे यांनी आपल्या भाषणात शहरातील पाणीप्रश्नांवरून प्रशासनावर ताशेरे ओढले. पवना धरण १०० टक्के भरले असताना शहराला मुबलक पाणीपुरवठा होत नाही. यास पाणीपुरवठा विभागाचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे. अधिकारी केवळ तांत्रिक कारणे देत आहेत. पण त्यावर सोल्युशन काढत नाहीत. नागरिकांतून पाण्याबाबत तक्रारी वाढल्या आहेत. तरीही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. नगरसेवकांचे फोन उचलत नाही. कामचुकार अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नका.  सर्वांना शिस्त, नियम लावून द्या, अशा सुचना त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिल्या.

सीमा सावळे पुढे म्हणाल्या की, शहरात पाणीपुरवठ्याबाबत २४ बाय ७ ही संकल्पना चांगली होती. पण प्रशासनाला ही योजना राबविण्यात यश आले नाही. शहराच्या वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्याची कोणतीही  व्यवस्था नाही. आंद्रा, भामा आसखेड धरणातील पाणी आणण्याचे काय झाले? अनेक योजना बंद पडल्या आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.

अतिवृष्टीमुळे पवना नदीला पूर आल्याने नदीलगतचा भाग पाण्याखाली गेला. यास नदीच्या पात्रात केलेल अतिक्रमण जबाबदार आहे. राडारोडा टाकल्याने नदीचे पात्र अरूंद झाले आहे. बांधकाम करण्यासाठी भराव टाकला जात आहे. ड्रेनेजची व्यवस्था नाही. पुररेषेत बांधकामे सुरू आहेत. अतिक्रमणे काढली जात नाहीत. यास जबाबदार कोण? असा सवाल  करून त्यांचा शोध घ्या, असे त्यांनी सांगितले.

शहरात पाणी, आरोग्य, कचरा प्रश्न बिकट बनला आहे. यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना शिक्षा करा. कामाबाबत प्रशासन योग्य अंमलबजावणी करत आहे की नाही, याकडे लक्ष द्या. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नका. कोण कुठे कमी पडत आहे, हे शोधून काढा. नागरिकांच्या तक्रारीसाठी कॉल सेंटर सुरू करा. योग्यरितीने यंत्रणा राबवा. प्रत्येक अधिकाऱ्यांनी २४ तास ऑन ड्युटी असणे आवश्यक करा, अशा सुचना सीमा सावळे यांनी यावेळी केल्या.